AUS vs PAK David Warner Big Announcement: ऑस्ट्रेलियन संघातील दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार हे आधीच घोषित केलं होतं. यासंदर्भातील माहिती त्याने काही महिने आधीच दिली होती. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीनंतर आपण कोणतीही कसोटी खेळणार नाही असं डेव्हिड वॉर्नरने स्पष्ट केलं होतं. मात्र नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी डेव्हीड वॉर्नरने ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला मोठा धक्का दिला आहे. वॉर्नरने पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्याच्या 3 दिवस आधीच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे.
नुकत्याच भारतात झालेल्या वर्ल्ड कप 2023 मध्ये ऑस्ट्रेलियन संघाकडून खेळताना वॉर्नरने उत्तम कामगिरी केली होती. पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीआधीच पत्रकारांशी बोलताना वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमधून संन्यास घेत असल्याची घोषणा केली. "मी नक्कीच एकदिवसीय क्रिकेटमधूनही संन्यास घेत आहे. भारतामध्ये वर्ल्ड कपची स्पर्धा जिंकणं हे फार मोठं यश आहे, असं मी म्हटलं होतं. मी आज संन्यास घेण्याचा निर्णय घेईन. त्यामुळे मला जगभरातील अन्य काही लीगमध्ये खेळण्याची परवानगी मिळेल," असं वॉर्नरने म्हटलं आहे.
वर्ल्ड कपमध्ये डेव्हिड वॉर्नरने दमदार कामगिरी केली. त्याने 11 सामन्यांमध्ये 2 शतकं आणि 2 अर्धशतकांच्या जोरावर 535 धावा केल्या. यामध्ये एका सामन्यात वॉर्नरने एकट्याने 163 धावा केलेल्या. वर्ल्ड कपच्या इतिसाहासामध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये वॉर्नर 6 व्या स्थानी आहे.
वॉर्नरने 2009 साली एकदिवसीय सामन्यांमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने आपल्या करिअरमध्ये एकूण 161 सामन्यांमध्ये 33 अर्धशतकं आणि 22 शतकांच्या मदतीने 6932 धावा केल्या. पाकिस्तानी आणि ऑस्ट्रेलियादरम्यानची शेवटची कसोटी 3 जानेवारी रोजी खेळवली जाणार आहे. हा सामना वॉर्नरचा शेवटचा कसोटी सामना असणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉनसनने वॉर्नरची शेवटची कसोटी मालिका सुरु होण्याआधी त्याच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केल्याने नवीन वादला तोंड फुटलं होतं.. डेव्हिड वॉर्नरला एखाद्या हिरोप्रमाणे त्याच्या कारकिर्दीमधून निरोप का दिला जात आहे? असा सवाल जॉनसनने उपस्थित केला. 2018 मधील बॉल टॅम्परिंग प्रकरणामध्ये त्याचं नाव आलेलं होतं, असं असतानाही त्याला हिरो का मानलं जात आहे? असा थेट सवाल वॉर्नरच्या माजी सहकाऱ्याने विचारला. वॉर्नरला ऑस्ट्रेलियात खेळवल्या जाणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात संधी देण्यात आल्यानंतर मिचेल जॉनसनने हा सवाल उपस्थित केला होता.