Asia Cup 2023: एशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडिया (Team India) सज्ज झाली असून 2 सप्टेंबरला भारत आपला पहिला सामना खेळणार आहे. 30 सप्टेंबरला एशिया कप स्पर्धेला (Asia Cup 2023) सुरुवात होणार असून 2 सप्टेंबरला टीम इंडिया कट्टर प्रतिस्पर्धा पाकिस्तानशी (India vs Pakistan) दोन हात करेल. श्रीलंकेतल्या कँडी इथं हा सामना खेळवला जाणार आहे. गेल्या एशिया कप स्पर्धेत भारताला साखळीतच गारद व्हावं लागलं होतं. पण यावेळी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया विजयाच्या इराद्याने उतरणार आहे. टीम इंडियाच्या कामगिरीकडे करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. पण त्याचबरोबर एशिया कप स्पर्धेत आणखी एक मोठा विक्रम होण्याची शक्यता आहे.
रोहित शर्मा करणार मोठा विक्रम
एशिया कप स्पर्धेत टीम इंडियाबरोबरच कर्धणार रोहित शर्माच्या कामगिरीकडेही क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. स्पर्धेत 163 धावा करताच रोहित शर्माच्या नावावर एक मोठा विक्रम जमा होईल. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा तो पार करेल. अशी कामगिरी करणारा तो सहावा भारतीय फलंदाज ठरणार आहे.
रोहितची एकदिवसीय क्रिकेट कारकिर्द
रोहित शर्माच्या नावावर आता 9,837 धावा जमा आहेत. म्हणजेच दहा हजार धावा करण्यासाठी त्याला फक्त 163 धावांची गरज आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक तीन डबरसेंच्युरी रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहित शर्मा भारतासाठी आतापर्यंत तब्बल 244 एकदिवसीय सामने खेळला आहे. यात त्याने 9,837 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर 30 सेंच्युरी आणि 48 हाफसेंच्युरी जमा आहे. विशेष म्हणजे एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माने 8 विकेटही घेतल्या आहेत.
10 हजार धावा करणारे भारतीय खेळाडू
18,426- सचिन तेंडुलकर
12,898- विराट कोहली
11,221- सौरव गांगुली
10,768- राहुल द्रविड़
10,599- महेंद्र सिंह धोनी
पाकिस्तानविरुद्ध संभाव्य प्लेइंग-11
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर/तिलक वर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल/कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
एशिया कपसाठी भारतीय संघ
ओपनर: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल.
मिडिल ऑर्डर: विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव
विकेटकीपर: ईशान किशन, केएल राहुल, संजू सॅमसन (स्टॅंडबाय).
ऑलराउंडर: हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, तिलक वर्मा
वेगवान गेंदबाज: जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, प्रसिद्ध कृष्णा
स्पिनर: कुलदीप यादव