Ashish Nehra On T20I Team India: भारताचा सलामीवीर यशस्वी जयसवालला अखेर भारतीय संघात संधी मिळाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीमध्ये 700 हून अधिक धावा केल्यानंतर यशस्वीला आयपीएलमध्ये खास कामगिरी न करता आल्याने त्याला टी-20 वर्ल्ड कप संघात स्थान मिळालं होतं पण एकही सामना खेळला नाही. मात्र आता विराट कोहली आणि रोहित शर्माने टी-20 अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने यशस्वीच्या करिअरला बुस्ट मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यशस्वी शुभमन गिलच्या सोबतीने भारतीय संघासाठी सलामीवीर म्हणून मैदानात उतरल्याचं पाहायला मिळू शकतं. यशस्वी हा 2026 च्या टी-20 वर्ल्ड कप सेटअपमध्ये भारतीय संघात नक्की असेल असं सांगितलं जात आहे.
यशस्वीला टी-20 वर्ल्ड कपनंतरच्या झिम्बावेविरुद्धच्या टी-20 मालिकेमध्ये संघात स्थान मिळालं होतं. त्याने चौथ्या टी-20 मध्ये 93 धावा केल्या होत्या. आता त्याने श्रीलंका दौऱ्यावर पल्लकेली येथील श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 40 धावा केल्या. या डावखुऱ्या फलंदाजाने चार चौकार आणि दोन षटकार लगावत पॉवरप्लेमध्ये संघाला उत्तम सुरुवात करुन दिली. दिली. शुभमनने 16 बॉलमध्ये 34 धावा केल्या. दोघांनाही भारतीय संघाचे सलामीवीर भविष्यात कसे असतील याची झलक दाखवून दिली.
मात्र भारताचा माजी क्रिकेटपटू तसेच गुजरात टायटन्स संघाचा प्रशिक्षक आशिष नेहराने यशस्वी जयसवालसंदर्भात मोठं विधान केलं आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा निवृत्त झाले नसते तर आपल्याला यशस्वी नेट्समध्येच फटकेबाजी करताना दिसला असता, असं नेहराने म्हटलं आहे. विराट आणि रोहित अजून काही काळ खेळले असते तर जयसवालला अजून बराच काळ संघात संधी मिळण्यासाठी वाट पहावी लागली असती, असं नेहराने सूचित केलं.
नक्की वाचा >> ...तर हार्दिकला टीम इंडियात ठेवणं धोकादायक; शास्त्रींनी अगदी स्पष्ट आणि थेटच सांगितलं
"रोहित शर्मा आणि विराट कोहली अजून टी-20 अंतरराष्ट्रीय सामने खेळत असते तर काय झालं असतं असं अजय जडेजाने विचारलं. माझ्यामध्ये एकच फरक पडला असता तो म्हणजे तू जे शॉट्स आज मैदानात खेळला ते नेट्समध्येच खेळत असतास. आता तुला मैदानात उतरुन खेळायची संधी मिळत आहे कारण ते (विराट आणि रोहित) संघात नाहीत," असं नेहराने यशस्वीशी बोलाना सांगितलं. हे दोघेही सामन्यानंतर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील एका कार्यक्रमात बोलत होते.
Nehraji never disappoints
P.S. When we see fierce batting, @YUVSTRONG12 is always on our mind #SonySportsNetwork #SLvIND #AshishNehra | @ybj_19 pic.twitter.com/y1gAo1RmiT
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 27, 2024
नेहराने मस्करीमध्ये हे विधान केलं आणि त्यावर यशस्वी मनसोक्तपणे हसला असला तरी या विधानामुळे खरोखरच विराट आणि रोहितमुळे तरुण खेळाडूंना संधी मिळाली नाही का यासंदर्भातील चर्चा चाहत्यांमध्ये सुरु झाली आहे.