Robin Uthappa Arrest Warrant Issued : भारतीय क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारताचा माजी क्रिकेटर रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) याच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. 39 वर्षीय माजी फलंदाजावर कर्मचाऱ्यांच्या प्रोविडेंट फंडचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. हे वॉरंट क्षेत्रीय पीएफ आयुक्त सदाक्षरी गोपाल रेड्डी यांनी जारी केलं असून पुलकेशिनगर पोलिसांना आवश्यक ती कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
माजी क्रिकेटर रॉबिन उथप्पा 'सेंचुरीज लाइफस्टाइल ब्रांड प्राइवेट लिमिटेड' ही कंपनी सांभाळत होता. त्याच्यावर आरोप आहे की त्याने कर्मचाऱ्यांच्या खात्यातून पीएफची रक्कम कापली परंतु ती रक्कम कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा केलीच नाही. त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रॉबिन उथप्पावर एकूण 23 लाख रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. पीएफ आयुक्तसदाक्षरी गोपाल रेड्डी यांनी 4 डिसेंबर रोजी एक पत्र पुलकेशिनगर पोलिसांना लिहिलं होतं. ज्यात उथप्पा विरोधात वॉरंट जरी करून त्याला अटक करण्यात यावे असे निर्देश दिले होते. परंतु पोलिसांनी हे वॉरंट पीएफ कार्यालयाला हे कारण सांगून परत दिलं की रॉबिन उथप्पाने त्याच राहण्याचं ठिकाण बदललं आहे.
हेही वाचा : कोण आहे सुशीला मीणा? जिच्या बॉलिंग स्टाईलचा फॅन बनला क्रिकेटचा देव, Video शेअर करून केलं कौतुक
भारताचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पा हा लोकप्रिय क्रिकेटर्सपैकी एक असून त्याने 14 सप्टेंबर 2022 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. रॉबिन उथप्पाने भारताकडून एकूण 46 वनडे सामन्यात 934 धावा केल्या असून दरम्यान 6 अर्धशतक ठोकली आहेत. तसेच टी 20 मध्ये 13 सामन्यात त्याने 249 धावा केल्या. उथप्पा इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्सचा भाग राहिला. आयपीएलमध्ये त्याने एकूण 205 सामने खेळले असून यात 4952 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 27 अर्धशतक ठोकली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर लेजेंड्स क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसतो. अलीकडेच हाँगकाँग सिक्स स्पर्धेत तो सहभागी झाला होता तेथे उत्कृष्ट फलंदाजी केली.