नवी दिल्ली : एमएस धोनीचं भारताचा कर्णधार म्हणून शानदार रेकॉर्ड आहे, पण भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरच्या मते त्याने खेळलेल्या कर्णधारांमध्ये अनिल कुंबळे सर्वोत्तम आहे. धोनी आणि सौरव गांगुलीसाठी माझ्या मनात आदर आहे, पण कुंबळेने जास्त कालावधी भारताचं नेतृत्व केलं असतं, तर कर्णधार म्हणून त्याचं रेकॉर्ड सर्वोत्तम झालं असतं, असं गंभीर म्हणाला.
रेकॉर्ड बघितलं तर धोनी सर्वोत्कृष्ट आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने आयसीसीची प्रत्येक ट्रॉफी जिंकली. धोनीने टीमचं नेतृत्वही उत्तम केलं. बराच कालावधी धोनीने टीमची जबाबदारी सांभाळली. सौरव गांगुलीनेही मोलाची भूमिका निभावली, असं मत गंभीरने मांडलं.
स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट कनेक्ट या कार्यक्रमात गंभीर बोलत होता. कुंबळेला नेतृत्व करण्यासाठी जास्त कालावधी मिळायला हवा होता, असं मला वाटतं. कुंबळेच्या नेतृत्वात मी ६ टेस्ट मॅच खेळल्या. कुंबळे जर जास्त वेळ कर्णधार राहिला असता, तर निश्चितच त्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड झाली असती, असं गंभीरने सांगितलं.
२००७ साली राहुल द्रविडने नेतृत्व सोडल्यानंतर अनिल कुंबळेकडे टीमची जबाबदारी आली. कुंबळेच्या नेतृत्वात भारताने १४ टेस्ट मॅच खेळल्या, यातल्या ३ टेस्टमध्ये भारताचा विजय झाला, तर ६ टेस्टमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला. उरलेल्या ५ टेस्ट मॅच ड्रॉ झाल्या. नोव्हेंबर २००८ साली कुंबळेने संन्यास घेतला. कुंबळेनंतर धोनीकडे टीम इंडियाचं नेतृत्व आलं. धोनीला तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार करण्यात आलं.
आयपीएलमध्ये रोहित शर्मा हा सर्वोत्कृष्ट कर्णधार आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबई ४ वेळा आयपीएल जिंकली, अशी प्रतिक्रिया गंभीरने दिली. कारकिर्द संपवताना रोहित आयपीएल इतिहासातला सर्वोत्तम कर्णधार होऊ शकतो. तोपर्यंत रोहितच्या नावावर ६ किंवा ७ आयपीएल ट्रॉफी असू शकतात, असं भाकित गंभीरने वर्तवलं.