Rishi Panchami 2024 : बाप्पांच्या आगमनानंतर येणारी ऋषी पंचमी महिलांसाठी का आहे खास? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त व शुभ संयोग

Rishi Panchami 2024 : गणेश चतुर्थीनंतर येणारा ऋषी पंचमीचा सण हा महिलांसाठी अतिशय खास आहे. यादिवशी 7 ऋषींची पूजा करण्यात येते. ऋषी पंचमी पूजेची शुभ वेळ, पद्धत आणि कथा जाणून घ्या.

नेहा चौधरी | Updated: Sep 7, 2024, 02:45 PM IST
Rishi Panchami 2024 : बाप्पांच्या आगमनानंतर येणारी ऋषी पंचमी महिलांसाठी का आहे खास? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त व शुभ संयोग title=
rishi panchami 2024 date and time shubh muhurat shubh sanyog katha aarti significance in marathi

Rishi Panchami 2024 : सर्वत्र गणेशोत्सवामुळे वातावरण अतिशय भक्तीमय झालंय. गणेश चतुर्तीनंतर दुसऱ्या दिवशी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला ऋषी पंचमी साजरी करण्यात येते. ऋषी पंचमीचं व्रत हे महिलांसाठी खास असून या दिवशी 7 ऋषींची पूजा करण्यात येते. महाराष्ट्रात या दिवशी ऋषीची भाजी करण्याची परंपरा आहे. हरतालिका व्रतानंतर ऋषी पंचमीचं व्रतही पतीच्या दीर्घयुष्यासाठी करण्यात येतं. 

'या' ऋषींची महिला करता पूजा!

कश्यप, अत्री, भारद्वाज, वशिष्ठ, गौतम, जमदग्नी आणि विश्वामित्र या सात ऋषींची पूजा केली जाते. सप्तऋषींची पूजा करण्याची पंरपरा अनेक वर्षांपासून सुरु असून हे व्रत महिलांनी केल्याने मासिक पाळीच्या दोषांपासून मुक्त होतात असं मान्यता आहे. 

ऋषी पंचमी 2024 तिथी

मराठी पंचांगानुसार ऋषी पंचमी तिथी ही भाद्रपद शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 7 सप्टेंबरला संध्याकाळी 5.37 मिनिटांपासून 8 सप्टेंबरला रात्री 7.58 मिनिटांपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार ऋषी पंचमी 8 सप्टेंबरला साजरी करण्यात येणार आहे.

ऋषी पंचमी 2024 पूजा शुभ मुहूर्त

सप्त ऋषींच्या पूजेची वेळ - सकाळी 11.03 ते दुपारी 01.34

महिलांसाठी का आहे खास?

ऋषीपंचमीचं व्रत सवाशीण महिला करतात. या व्रताच्या दिवशी महिलांनी धान्य खाऊ नये अशी आख्यायिका आहे. आजही ग्रामीण भागात शेताची नांगरणी करताना बैलाचे पाय ज्या धान्याला लागतात आणि नांगराचा वापर केलेले अन्न पदार्थ ऋषीपंचमीच्या दिवशी खाल्लेच जात नाहीत. अशी प्रथा आहे.

म्हणूनच या दिवशी शेताच्या बांध्यावर उगवलेल्या रानभाज्या भाज्या आणि कंदमुळं खाल्ली जातात. आता या सर्व भाज्या शहरांमध्येही बाजारात उपलब्ध असतात. शहरांमध्ये काही भागात ग्रामीण भागातील भाजी विक्रेते या भाज्या विकायला घेऊन येतात.

ऋषी पंचमी पूजा विधी

ऋषी पंचमीची पूजा करण्यासाठी महिलांनी सकाळी सूर्योदयापूर्वी पवित्र गंगा नदीत स्नान करावे. 
घरातल्या पाण्यात गंगाजल टाकूनही स्नान करू शकता.
पूजेच्या ठिकाणी शेण सारवून चौकोनी वर्तुळ करून त्यावर सात ऋषी काढा.
सप्त ऋषींना दूध, दही, तूप, मध आणि पाण्याने अभिषेक करा. 
गंध, तांदूळ, उदबत्ती, दिवा इत्यादींनी पूजा करावी.
पूजा करताना हा मंत्र वाचा - कश्यपोत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोय गौतम:।जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषय: स्मृता:।। गृह्णन्त्वर्ध्य मया दत्तं तुष्टा भवत मे सदा।।
मासिक पाळीच्या काळात धार्मिक कार्यात काही चूक झाली असेल तर त्याबद्दल महिलांनी माफी मागितली पाहिजे.
यानंतर कथा श्रवण करून तूप लावून होम करावा. या दिवशी ब्राह्मणाला केळी, तूप, साखर आणि केळी दान करा. तसेच आपल्या क्षमतेनुसार दक्षिणा देणेही शुभ आहे.

ऋषी पंचमी कथा

भविष्यपुराणातील एका कथेनुसार, उत्तक नावाचा ब्राह्मण त्याची पत्नी सुशीलासोबत राहत होता. त्यांचा मुलगा आणि मुलगी दोघेही विवाहयोग्य होते. उत्तक ब्राह्मणाने आपल्या मुलीचे लग्न एका योग्य वराशी लावले, परंतु काही दिवसांनंतर तिच्या पतीचे अकाली निधन झाले. यानंतर त्यांची मुलगी माहेरी परतली. एके दिवशी, विधवा मुलगी एकटीच झोपली होती, तेव्हा तिच्या आईच्या लक्षात आले की, तिच्या मुलीच्या अंगावर किडे वाढत आहेत. आपल्या मुलीची अशी अवस्था पाहून उत्कची पत्नी घाबरली.

तिने आपल्या मुलीला पती उत्तक यांच्याकडे आणून आपल्या मुलीची अवस्था दाखवली आणि म्हणाली, 'माझी साध्वी मुलगी अशी कशी झाली?' मग उत्तक ब्राह्मणाने ध्यान केल्यावर पाहिले की त्याच्या मागील जन्मात त्याची मुलगी ही ब्राह्मणाची मुलगी होती, परंतु मासिक पाळीच्या वेळी त्याने चूक केली. ऋषीपंचमीलाही उपवास केला नाही. यामुळे तिला हा त्रास सहन करावा लागला आहे. त्यानंतर वडिलांच्या सल्ल्यानुसार या जन्मातील संकटांपासून मुक्ती मिळावी म्हणून मुलीने पंचमीचे व्रत केले. हे व्रत केल्याने उत्तकच्या कन्येला शाश्वत सौभाग्य प्राप्त झाले.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)