एकदिवसीय क्रिकेटमध्ये आज भारत आणि बांगलादेश संघ भिडणार आहेत. पुण्यातील गहुंजे स्टेटिअमवर हा सामना होणार आहे. दुपारी 2 वाजता या सामन्याला सुरुवात होणार असून, मैदानाबाहेर क्रिकेट चाहत्याची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सामना पाहण्यासाठी येणारे प्रेक्षक या स्टेडिअमकडे जाणाऱ्या रस्त्याने प्रवास करणार असल्याने मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते. यामुळे पुणे पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत. जर तुम्ही पुण्यात असाल आणि या रस्त्यांनी प्रवास करणार असाल तर याकडे दुर्लक्ष करु नका. अन्यथा तुम्ही वाहतूक कोंडीत अडू शकता.
पुण्यातील गहुंजेमधील एमसीए स्टेडिअमवर या वर्ल्डकपमधील पहिला सामना आज होणार आङे. भारत आणि बांगलादेश यांच्यात हा सामना रंगणार आहे. यानिमित्ताने पुण्यात तब्बल 27 वर्षांनी क्रिकेट सामने होणार असल्याने चाहते उत्सुक आहेत. या उत्सुकतपोटी मैदानात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती देहू रोड पोलिसांनी दिली आहे. हजारोंच्या संख्येने प्रेक्षक येणार असल्याने होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता हे बदल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
1) मामुर्डी अंडर (मासुलकर फार्म) येथून कृष्णा चौकात जाण्यास मनाई आहे.
पर्यायी मार्ग - लोढा येथून येणाऱ्या वाहनांनी मामुर्डी अंडरपास येथे उजवे वळण घेऊन बापदेव बुवा मार्गे कृष्णा चौकाकडे जावे.
2) मामुर्डी गावापासून मामुर्डी अंडरपास (मासुलकर फार्म) बाजूने प्रवेश बंदी आहे.
पर्यायी मार्ग - या मार्गावरील वाहनांनी मामुर्डी जकात नाक्यामार्गे त्यांच्या इच्छित स्थळी जावे.
3) सामना संपल्यानंतर मामुर्डी अंडरपास बाजूने मामुर्डी अंडरपासकडे जाण्यासाठी प्रवेश
साईनगर परिसरातील पार्किंग क्र. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 10, 11, 12, 13 मधील वाहनांसाठी बंद राहील.
4) वाहने साईनगर रोड ते सेंट्रल चौकमार्गे इच्छित स्थळी जातील.
पर्यायी मार्ग - या मार्गावरील वाहने शितळा देवी-मामुर्डी जकात नाका मार्गे त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचतील.
5) अत्यावश्यक सेवा वाहने वगळून कार पासधारक वाहने आणि सर्व प्रकारच्या वाहनांसाठी गहुंजे ब्रिज Y जंक्शन मार्गे स्टेडियममध्ये प्रवेश प्रतिबंधित आहे.
6) मुंबईहून येणाऱ्या आणि स्टेडियमकडे जाणाऱ्या गाड्यांना देहू रोडने एक्स्प्रेसवेला लागून असलेल्या सर्व्हिस रोडने जाण्यास बंदी आहे.
वर्ल्डकपमधील एकूण 5 सामने गहुंजे मैदानावर होणार आहेत. यातील पहिली लढत आज आहे. सर्व पाच सामान्यांसाठी महापालिका भवन, कात्रज आणि निगडी टिळक चौक या तीन स्थानकावरून गहुंजेसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
- पुणे मनपा बसस्थानक - दुपारी 11:00, 11:35, 12 :00 वाजता बस असणार आहे त्यासोबतच जाताना आणि येताना प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येकी 100 रुपये तिकीट असणार आहे.
- कात्रज बसस्थानक - दुपारी 11:00, 11:30 वाजता बस असणार आहे. त्यासोबतच जाताना आणि येताना प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येकी 100 रुपये तिकीट
- निगडी बसस्थानक - दुपारी 12:00, 12:30 वाजता, जाताना आणि येताना प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येकी 50 रुपये तिकीट
पीएमपीच्या या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.