अमेरिकेत Income Tax रद्द? ट्रम्प यांचं सूचक विधान; सरकार पैसा कसा कमावणार हे ही सांगितलं

US President Donald Trump On Income Tax: अमेरिका लवकरच फार श्रीमंत देश होणार आहे. हे अत्यंत वेगाने घडेल, असा विश्वास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना व्यक्त केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 29, 2025, 08:16 AM IST
अमेरिकेत Income Tax रद्द? ट्रम्प यांचं सूचक विधान; सरकार पैसा कसा कमावणार हे ही सांगितलं title=
एका कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांचं विधान (प्रातिनिधिक फोटो)

US President Donald Trump On Income Tax: अमेरिकेतील नागरिकांना आयकरमुक्ती देण्यासंदर्भात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सूचक विधान केलं आहे. अमेरिकेतील ग्रॅण्ड ओल्ड पार्टी डिनरच्या कार्यक्रमात बोलता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला अधिक सधन राष्ट्र बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर लादण्याचा उल्लेख केला. ग्रेट टेरिफ कमिशनविरोधात बोलतान ट्रम्प यांनी आयकर रद्द करुन त्याऐवजी परदेशातून येणाऱ्या गोष्टींवर अधिक कर आकारण्याचा विचार योग्य असल्याचं म्हटलं आहे. निवडणूक प्रचारामधील आपल्या 'मेकिंग अमेरिका ग्रेट अगेन' या धोरणानुसारच 'मेकिंग अेरिका रिच अगेन' धोरण तातडीने राबवण्यासाठी हा मार्ग योग्य असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. 

अमेरिका श्रीमंत होणार

"अमेरिका लवकरच फार श्रीमंत होणार आहे. फार वेगाने घडामोडी घडतील आणि अमेरिका श्रीमंत होईल. आपल्याला श्रीमंत करणाऱ्या सिस्टीमकडे पुन्हा वळण्याची हीच योग्य वेळ आहे. आपण यामुळे यापूर्वी जितके शक्तीशाली नव्हतो तेवढे शक्तीशाली, सामर्थ्यवान होऊ," असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. पूर्वीची यंत्रणा कशी होती याबद्दल ट्रम्प यांनी आपल्या भाषणात माहिती दिली. इतर देशांमधून येणाऱ्या वस्तूंवर आणि गोष्टींवर कर लादल्याने कशाप्रकारे सरकारी गंगाजळी सुरु होती याबद्दलची माहिती ट्रम्प यांनी दिली. पूर्वी अमेरिकेतली नागरिकांकडून आयकर आकारला जात नव्हता, अशी आठवणही ट्रम्प यांनी करुन दिली.

आपल्याकडे आयकर नव्हता

"आपल्याकडे त्यावेळी आयकर नव्हता. आयकर 1913 मध्ये आला. मी मागील आठवड्यात माझ्या भाषणात म्हणालेलो त्याप्रमाणे, आपल्या देशातील नागरिकांवर कराचा बोजा टाकून इतर देशांना श्रीमंत करण्यापेक्षा आपण इतर देशांवर कर लादून आपल्या नागरिकांना श्रीमंत केलं पाहिजे," असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या अमेरिकेमध्ये 10 ते 32 टक्के आयकर आकारला जातो.

आपल्याच लोकांकडून कर घेण्यापेक्षा

"1870 ते 1913 हा काळ अमेरिकी इतिहासातील सर्वात सधन कालावधी होता. त्यानंतर ग्रेट टेरिफ कमिशनची स्थापना करण्यात आली. त्यांच्याकडे एकच काम होतं की कर स्वरुपात गोळा केलेला एवढा पैसा नेमका काय करायचा," असंही ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी अमेरिकी लोकांकडून कर घेण्याऐवजी परदेशी गोष्टींवरील कर वाढवण्याचं धोरण स्वीकारलं पाहिजे असा युक्तीवाद ट्रम्प यांनी केला. 

देशाच्या सीमा सुरक्षित करणार

हाऊस ऑफ रिपब्लिकन्ससमोर भाषण देताना ट्रम्प यांनी देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी अधिक खर्च केला पाहिजे असंही ट्रम्प म्हणाले. बेकायदेशीरपणे देशात घुसखोरी करणाऱ्यांविरोधात ट्रम्प सरकार कठोर भूमिका घेणार असल्याचं आधीच स्पष्ट करण्यात आळं आहे. काही कठोर निर्णय आगामी काही दिवसांमध्ये घेतले जातील असं सांगितलं जातं आहे.