पुणे : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यानं गेल्या वर्षीची सरासरी ओलांडली आहे. पुणे आणि परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. रात्रभर सर्वत्र जोरदार पाऊस सुरू होता.
गेले काही सुरू आलेल्या दमदार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. खडकवासला धरण साखळीत आज पहाटे पर्यंत 8.70 टीएमसी म्हणजेच 29.85 % पाणीसाठा झाला आहे.
गेल्या वर्षी आजच्या तारखेला धरणांमध्ये 8.63 टीएमसी म्हणजेच 29.62 % इतका पाणीसाठा होता. महत्त्वाचं म्हणजे पुढचे 72 तास असाच पाऊस सुरू राहणार असून अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा वेधशाळेनं दिला आहे.
जुन महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने पुणे महापालिकेने पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. आता पुण्याच्या धरण साखळीत दमदार पाऊस झाल्याने पाणी कपात 26जुलै पर्यंत रद्द करण्यात आली आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाऊस झाल्यास ही कपात कायमचीच रद्दच करण्यात येऊ शकते.