सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : उपचारासाठी आलेल्या तरुणीवर डॉक्टरने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आलं आहे. याप्रकरणी डॉक्टरविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला असून आरोपी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
19 वर्षांची तरुणी कोथरुडमधल्या डॉ. योगेश वाल्हे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी आली होती. पण उपचाराच्या नावाखाली डॉक्टरने या तरुणीचे मोबाईलमध्ये नग्न अवस्थेतील फोटो काढले. याविषयी कुणाला काही सांगितल्यास सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
कोथरूड परिसरातील पौड रस्त्यावर डॉ. योगेश वाल्हे याचं क्लिनिक आहे. तरुणी मणक्याच्या आजाराचे उपचार करण्यासाठी त्या ठिकाणी आली होती. यावेळी योगेश वाल्हे याने उपचार करण्याच्या बहाण्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. नोव्हेंबर 2019 ते डिसेंबर 2020 या कालावधीत वारंवार हा प्रकार घडला.
संबंधित डॉक्टर आरोपीने फिर्यादीचे नग्न अवस्थेतील फोटो मोबाईल मध्ये काढले आणि याविषयी कोणाला काही सांगितल्यास हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे अखेरीस या तरुणीने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर कोथरूड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी डॉक्टरला अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.