अभिनेता सुबोध भावे काँग्रेसच्या मंचावर; राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत

सुबोध भावे आणि आरजे मलिष्का यांच्या सूत्रसंचलनामुळे काँग्रेसच्या या कार्यक्रमाला चांगलीच रंगत आली.

Updated: Apr 5, 2019, 03:24 PM IST
अभिनेता सुबोध भावे काँग्रेसच्या मंचावर; राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत title=

पुणे: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या शुक्रवारी पुण्यात पार पडलेल्या कार्यक्रमानंतर महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात एका वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता सुबोध भावे आणि आरजे मलिष्का यांनी केले. मात्र, सुबोध भावे हे शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष असल्याने त्यांची काँग्रेसच्या मंचावरील उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. हा कार्यक्रम संपल्यानंतर सुबोध भावे शिवसेनेपासून दुरावत असल्याची कुजबुजही सुरु झाली. अखेर सुबोध भावे यांनीच स्पष्टीकरण देत या प्रकरणावर पडदा टाकला. मी काँग्रेसच्या व्यासपीठावर गेलो होतो. मात्र, त्यासाठी मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परवानगी घेतली होती, असे सुबोधने सांगितले. 

सुबोध भावे आणि आरजे मलिष्का यांच्या सूत्रसंचलनामुळे काँग्रेसच्या या कार्यक्रमाला चांगलीच रंगत आली. या दोघांनी राहुल गांधी यांना अनेक मुद्द्यांवर बोलते करण्याचा प्रयत्न केला. सुबोध भावे याने मजेशीरपणे राहुल गांधींना मी तुमचा बायोपिक करत असल्याचे सांगितले. परंतु, या चित्रपटासाठी नायिका कोण हे अजून ठरलेले नाही. तेव्हा तुम्हीच एखाद्या नायिकेचे नाव सुचवा, असा कोड्यात टाकणारा प्रश्न सुबोध भावेने राहुल गांधी यांना विचारला. यावर राहुल यांनी मी सध्या माझ्या कामातच गुंतून पडल्याचे सांगत प्रश्नाला बगल दिली. त्यावर मी बायोपिकमध्ये तुमच्या नायिकेचे नाव 'वर्क' असे ठेवत असल्याची मिष्किल टिप्पणी केली.