www.24taas.com, स्नेहा अणकईकर, झी मीडिया, मुंबई
नमस्कार..... सध्या तुमच्या जवळच मी मुक्कामाला आलोय. किमान चार महिने तरी माझा मुक्काम हलण्याची चिन्हं नाहीत. पाऊस आला रे आला की मी तुमच्या भेटीला न चुकता येतो. ब-याच वेळा आपल्या भेटीची सुरुवातच शिव्याशापांनी होते...... तुम्हा सगळ्यांना माझ्या नावानं बोटं मोडायची सवयच झालीय..... तुम्ही मला ठेचकाळता, अडखळता किंवा कधीकधी तर माझ्यामुळे तोल जाऊन पडतासुद्धा....... आणि मग माझ्यासह माझ्या शेकडो भावंडांना शिव्यांची लाखोली वाहता..... पण या सगळ्यामागे माझा उदात्त हेतू तुमच्या लक्षातच येत नाही.....
मी जर रस्त्यावर माझं अस्तित्व दाखवलं नाही, तर तुम्ही अडखळणार नाही, मग तुमची हा़डं कशी मोडणार आणि डॉक्टरचा बिझनेस कसा चालणार..... माझ्यात अडकून तुम्ही पडलात की चिखलानं माखणार..... मग चिखलानं माखलेले तुमचे कपडे स्वच्छ करण्यासाठी तमाम डिटर्जंट कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू होणार..... तुमची गाडी माझ्यामध्ये अडकली की तिचा बिच्चारीचा एखादा पार्ट तरी मोडतोच.... त्यावरच तर गॅरेजवाल्यांचा धंदा चालतो..... शिवाय खडी, डांबर, पेव्हर ब्लॉक्स यांचा धंदा वाढतो. ज्याला तुम्ही शिव्याशाप देता तो माझ्यासारखा खड्डा अख्ख्या अर्थव्यवस्थेला चालना देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा ज्यांनी ठेका घेतलाय, ते अनेक ठेकेदार, नगरसेवक, महापालिका अधिकारी, लोकप्रतिनिधी या सगळ्यांचे संसार माझ्यामुळेच तर उभे आहेत..... मी जर पावसाळ्यात रस्त्यांवर यायचंच नाही, असं ठरवलं तर नगरसेवकांना छानचौकी कशी मिरवता येणार, त्यांच्या हातातल्या अंगठ्या, पाजेरो, लँड क्रुझर कशा वाढणार? एखाद्याला कानाखाली मार, दुस-याला कोंडून ठेव, उठाबशा काढायला लाव, असे स्टंट कसे करायला मिळणार?
तुम्ही उगाचच महापालिकेच्या नावानं बोंबाबोंब करता.... `निर्लज्जं सदासुखी` या म्हणीचा खरा अर्थ माहीतच नाही तुम्हाला.... दर पावसाळ्यात माझ्यावरुन विनाकारण गदारोळ घालता आणि नगरसेवकांना जाब विचारत बसता. तुमची सर्वसामान्य माणसाची बुद्धी फक्त खड्ड्यांच्या नावानं खडे फोडण्याची.... त्या मंगळावरच्या आणि चंद्रावरच्या खड्ड्यांचं तुम्हाला केवढं ते कौतुक..... चंद्रावरच्या खड्ड्यांवरचे फोटो किती तन्मयतेनं पाहता, पण तोच फील तुम्हाला मी इथे तुमच्या पृथ्वीवर देतोय, तोही फुकटात.. त्याचं तुम्हांला कौतुकच नाही....
असो.... ही माझी छोटीशी कथा.... लवकरच मी `एका खड्ड्याचे खडे बोल` हे माझं आत्मचरित्र प्रसिद्ध करणार आहे....आणि त्याचे प्रकाशक आहेत समस्त महापालिका आणि नगरसेवक...... हे माझ्या आत्मचरित्राचं नुसतं ट्रेलर होतं..... आत्मचरित्र नक्कीच जबरदस्त असेल.....जाताजाता फक्त एकच सांगतो....... माझ्यामुळे एखादा ऍक्सिडेंट होतो आणि एखाद्याचा बळी जातो ना...... तेव्हा मी स्वतःलाच खूप शिव्या देतो..... कारण दर पावसाळ्यात मी जरी परत येणार असलो तरी जो जातो, त्याच्या घरचे पुढचे कित्येक पावसाळे कोरडेच जाणारे असतात......
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.