टेक्सास: जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन उशीखाली ठेवून झोपत असाल तर सावधान व्हा! अमेरिकेतील उत्तर टेक्सासमध्ये एका 13 वर्षीय मुलीच्या सॅमसंग गॅलेक्सी एस-4 स्मार्टफोनमध्ये आग लागली.
एरियल टोलफ्री नावाची ही मुलगी रात्री आपला फोन उशीखाली ठेवून झोपली होती. थोड्या वेळानंतर तिथून काही जळल्याचा वास येवू लागला. पण तिनं दुर्लक्ष केलं. मात्र जेव्हा तिची झोप उघडली, पाहते तर काय फोनला आग लागली होती. एरियलच्या वडिलांना वाटतं की, ओव्हरहिटिंगमुळं फोनची बॅटरी फुगली आणि तिनं आग धरली. सध्या फोनची अशी परिस्थिती आहे की, तो ओळखताही येत नाहीय. फोनचं प्लास्टिक आणि ग्लास वितळलाय.
घटनेनंतर एरियलच्या कुटुंबानं सॅमसंग आणि मीडियासोबत संपर्क साधून घटनेची माहिती दिली. सॅमसंगच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, त्यांचे प्रॉडक्ट्स पूर्णपणे सुरक्षित आहे आणि एरियलच्या फोनमध्ये सॅमसंगची नाही तर लोकल बॅटरी होती, त्यामुळं ही घटना घडली.
फोन सोबत नवं अंथरूण सुद्धा देणार कंपनी
कंपनीनं हे मान्य केलंय की, फोनला किती चार्ज करायचं आणि कुठे ठेवायचा याबद्दल अजून लोकांना जागरूक करणं गरजेचं आहे. म्हणून कंपनीनं यूजर गाईडमध्ये चेतावनीही छापली आहे. ज्यात लिहिलंय की, डिव्हाईसला अंथरूण किंवा अशा कोणत्याही वस्तून झाकू नये. कारण त्यामुळं हवेचा फ्लो थांबतो आणि आग लागू शकते. दरम्यान, सॅमसंगनं एरियलचा जळालेला फोन मागवला असून त्याचा पूर्ण तपास केला जाणार आहे. कंपनी फोन सोबतच एरियला नवं अंथरुणही द्यायला तयार झालीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.