विधानसभेत काँग्रेसलाच अशोक चव्हाण यांनी पकडले कोंडीत

मराठवाड्याच्या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विधानसभेत अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मराठवाड्याचा पैसा जातो कुठे हेच समजत नाही, असा काँग्रेस आघाडी सरकारला अशोक चव्हाण यांनी घरचा आहेर दिला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 19, 2013, 11:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
मराठवाड्याच्या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विधानसभेत अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मराठवाड्याचा पैसा जातो कुठे हेच समजत नाही, असा काँग्रेस आघाडी सरकारला अशोक चव्हाण यांनी घरचा आहेर दिला आहे.
मराठवाड्याचे अनेक प्रश्न अद्याप सुटलेले नाही. सामान्यांचे प्रश्न कायम असल्याने अशोक चव्हाण आक्रमक झालेत. त्यांनी आपल्याच सरकारला जाब विचारला. शांत असणारे अशोक चव्हाण मराठवाड्याच्या प्रश्नावर आज चिडलेत. मराठवाड्याचा पैसा जातो कुठे हेच समजत नाही, असा सवाल अशोक चव्हाण यांनी विधानसभेत सरकारलाच विचारला.
मराठवाड्यातील रस्त्यांची अवस्था एकदम दयनीय झाली आहे. तर राष्ट्रीय महामार्गाची दोन वर्षात वाताहत पाहायला मिळत आहेत. मंत्र्यांनी विमानाने जाण्याऐवजी रस्त्याने गेले तर वस्तुस्थिती समजेल, असा खोचक टोला लगावला. पायाभूत सुविधा समितीची बैठक होत नसेल तर रस्त्यांची कामे होणार कशी, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मराठवाडा विरुद्ध उत्तर महाराष्ट्र असा वाद वाढत जातोय. मात्र नियामक प्राधिकरण काहीच भूमिका घेत नाही. त्यामुळे हे असेच जर राहिले तर भविष्यात बिकट परिस्थिती आहे. हे वाद असे वाढणार असेल तर शासनाने तातडीने लक्ष द्यावे. प्रश्न रेंगाळत ठेवलेत तर महाराष्ट्राचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही, असा गंभीर इशाराही देताना तातडीने सरकारने पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी यावेळी अशोक चव्हाण यांनी केली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.