सिव्हिल हॉस्पिटल की मृत्यूचं दार?

ठाण्यातलं सिव्हील हॉस्पीटल नवजात बालकांसाठी मृत्यूचे दार ठरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. गेल्या सात महिन्यांत या हॉस्पीटलमध्ये तब्बल 78 बालकांचा मृत्यू झालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 19, 2012, 12:33 PM IST

www.24taas.com, ठाणे
ठाण्यातलं सिव्हील हॉस्पीटल नवजात बालकांसाठी मृत्यूचे दार ठरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. गेल्या सात महिन्यांत या हॉस्पीटलमध्ये तब्बल 78 बालकांचा मृत्यू झालाय. त्यामुळं हॉस्पीटल प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय.
ठाण्यातल्या गरीब रुग्णांना परवडणारं एकमेव हॉस्पिटल म्हणजे हे सिव्हील हॉस्पीटल. शेकडो गरोदर महिला उपचारासाठी इथं येतात. मात्र, या हॉस्पिटल संदर्भातील एक भयानक वास्तव समोर आलंय. १ जानेवारी २०१२ ते ३० जुलै २०१२ या सात महिन्यांच्या कालावधीत या हॉस्पिटलमध्ये ७८ नवजात बालकांचा मृत्यू झालाय. सिव्हील हॉस्पीटलमध्ये जन्मलेली ५०५ आणि बाहेर जन्मलेली ८३ अशी ५८८ बालके इथं दाखल होती. म्हणजे बालकांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असल्याचं दिसून येतंय. हॉस्पिटल प्रशासनानं मात्र याप्रकरणी हात झाडत बालकांच्या मृत्यूच्या कारणांची जंत्रीच मांडली.
ज्या विश्वासानं सिव्हील हॉस्पीटलमध्ये महिला बाळंतपणासाठी येतात त्या विश्वासाला पात्र ठरण्यात सिव्हील हॉस्पिटल अपयशी ठरतंय. त्यामुळं आरोग्य विभागानं याप्रकरणी चौकशी करुन त्वरित उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालीय.