www.24taas.com, डोंबिवली
डोंबिवलीतली रिक्षा भाडेवाढ मागे घेण्यात आलीय. रिक्षा संघटनांच्या बैठकीनंतर हा निर्णय झालाय. १ ते १५ रुपयांपर्यंतची दरकपात करण्यात आलीय. ‘झी २४ तास’नं या दरवाढी संदर्भातली बातमी दाखवली होती. त्यानंतर बैठक घेऊन ही दरकपात केली गेलीय.
गेल्या चार दिवसांपासून ‘झी २४ तास’नं लावून धरलेल्या कल्याण डोंबिवलीकरांच्या मागणीला यश आलंय. मुजोर रिक्षा संघटनांना अखेर कल्याण डोंबिवलीकरांपुढं नमतं घ्यावं लागलंय. रिक्षासंघटनांनी १ ते १५ रुपयांपर्यंतची दरकपात करत असल्याचं जाहीर केलंय. प्रवाशांचा कोणताही विचार न करता कल्याण डोंबिवलीत रिक्षा संघटनांनी अव्वाच्या सव्वा भाडेवाढ केली होती. या मुजोरीविरोधात कल्याण डोंबिवलीकरांनी रिक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. रिक्षांऐवजी त्यांनी केडीएमटीच्या बससेवेला पसंती दिली.
कल्याण डोंबिवलीकरांची हीच व्यथा ‘झी २४ तास’नं सातत्यानं मांडली. एरव्ही नागरी प्रश्नांवर कळवळा दाखवणारे राजकीय नेते या संपूर्ण प्रकरणात कुठेही पुढं आलेले नाहीत, असा सवालही ‘झी २४ तास’नं उपस्थित केला. त्यानंतर खडबडून जाग आलेल्या रिक्षा संघटनांनी बैठक घेऊन दरवाढ काही प्रमाणात मागं घेतल्यीचं रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केलं. या निर्णयाचं डोंबिवलीकरांनीही स्वागत केलंय. शिवाय ‘झी २४ तास’चे आभारही मानलेत. ‘झी २४ तास’च्या दणक्यामुळं मुजोर रिक्षा संघटनांनी दरकपात केलीय. अशाप्रकारे अन्यायाविरोधात वाचा फोडत सामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा ध्यासच ‘झी २४ तास’नं घेतलाय.