राणे-भुजबळ यांना शिवसेनेत येण्याचे आठवलेंचे निमंत्रण

शिवसेनचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्यामुळे आपल्याला शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याची वेळ आली, असे ज्या नेत्यांना वाटते अशा नेत्यांनी आता पुन्हा शिवसेनेत यावे, असा उपरोधिक टोला आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी लगावला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 17, 2013, 01:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्यामुळे आपल्याला शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याची वेळ आली, असे ज्या नेत्यांना वाटते अशा नेत्यांनी आता पुन्हा शिवसेनेत यावे, असा उपरोधिक टोला आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी लगावला आहे.
रिपाईच्यावतीने २३ नोव्हेंबर रोजी ठाणे जिल्ह्याच्या त्रिभाजनाच्या मागणीसाठी ठाण्याच्या सेन्ट्रल मैदानामध्ये एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याची माहिती देण्यासाठी रामदास आठवले हे ठाण्यात आले होते. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे , जिल्हा विभाजन लांबल्याचा आरोपही त्यांनी केला
दोन दिवसांपूर्वीच झालेल्या दसऱ्या मेळाव्यामध्ये जोशी यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे राणे आणि भुजबळ यांनी या मुद्द्यावर तोंडसुख घेतले होते. त्यानंतर आठवले यांनी ठाण्यात ही प्रतिक्रिया दिली आहे. जोशी यांना शिवसेनेने आतापर्यंत अनेक महत्वाची पदे दिली आहेत, त्यामुळे आता आराम करून मार्गदर्शकाची भूमिका बजवावी, असे सांगण्यासही आठवले विसरले नाहीत.
पक्ष नेतृत्वार टीका करणाऱ्या मनोहर जोशी यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच झालेल्या दसऱ्या मेळाव्यामध्ये शिवसैनिकांच्या विरोधामुळे व्यासपीठावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी ‘जे पेरले ते उगवलेट’ तर उद्योगमंत्री नारायण राणे यांनी ‘नियतीने त्यांना धडा शिकवला’, अशी टीका जोशी यांच्यावर केली होती. या दोनही नेत्यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना आठवले यांनी या दोघांना थेट शिवसेनेत पुन्हा येण्याचे सुचविले आहे. पक्ष नेतृत्वाला विश्वासात न घेता शिवाजी पार्कवर स्मारक उभारण्याची जोशी यांची मागणी चुकीची असल्याचे आठवले म्हणाले.
आगामी २०१४ च्या निवडणुकीसाठी आपण महायुतीसोबत असणार असल्याचे स्पष्ट करत लोकसभेच्या ३ तर राज्यसभेची एक जागा मागितली असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये कल्याण, मराठवाडा, पुणे आणि विशेष म्हणजे ज्या जागेवर मनोहर जोशी यांची लढण्याची इच्छा होती त्या दक्षिण मुंबईवर देखील आरपीआयने दावा केला आहे. पक्षप्रचारासाठी आपण लोकसभेची निवडणूक न लढता राज्यसभेवर जाण्याची इच्छा उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली असल्याचे त्यांनी सांगितले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.