'छत्रपतींना जन्म देणाऱ्या महाराष्ट्रात शहांनी ‘गांडुळां’ची..'; 'त्या' भाषणावरुन ठाकरेंची सेना आक्रमक

Amit Shah Speech In Shirdi: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांनी त्यांच्या संकटकाळात मोदी-शहांना मदत केली, अशी आठवणही ठाकरेंच्या शिवसेनेनं करुन दिली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 14, 2025, 08:02 AM IST
'छत्रपतींना जन्म देणाऱ्या महाराष्ट्रात शहांनी ‘गांडुळां’ची..'; 'त्या' भाषणावरुन ठाकरेंची सेना आक्रमक title=
ठाकरेंच्या सेनेचा शाहांच्या भाषणावरुन हल्लाबोल

Amit Shah Speech In Shirdi: "जो येतोय तो महाराष्ट्राला अक्कल शिकवतोय आणि धमक्याही देत आहे. याचे कारण भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाने महाराष्ट्राला नपुंसक केलेय. तसे नसते तर महाराष्ट्रात येऊन अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यांवर समोरच्या मराठी माणसांनी टाळ्या वाजवल्या नसत्या," अशा कठोर शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपाच्या शिर्डीतील अधिवेशनावरुन निशाणा साधला आहे.

शिर्डीत अमित शहा ज्या मंचावरून दगाबाजीवर प्रवचन झोडत होते, त्या मंचावरील...

"शिर्डीतील भाजप अधिवेशनात अमित शहा म्हणाले की, ‘‘महाराष्ट्रात भाजपला महाविजय मिळाला. विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचे राजकारण भाजपने 20 फूट जमिनीत गाडले. उद्धव ठाकरे यांचे दगाबाजीचे राजकारण संपवले.’’ अमित शहा यांची भाषा ही मस्तवालपणाची आहे. महाराष्ट्राचा विजय त्यांना नम्रपणे पचवता आला नाही व त्यामुळे ते बेताल झाले आहेत. शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे ही भाजपची रोजीरोटी आहे. लोकशाहीत टीकेला स्थान आहे. शिर्डीत अमित शहा ज्या मंचावरून दगाबाजीवर प्रवचन झोडत होते, त्या मंचावरील अर्ध्याहून अधिक नेते हे ‘दगाबाजी’ करूनच भाजपच्या मंचावर विराजमान झाले होते व त्यासाठी अमित शहा यांना ईडी, सीबीआयचा बांबू वापरावा लागला हे खरं नाही काय?" असा सवाल 'सामना'च्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

मोदी-शहा हे धाडस कधीच दाखवणार नाहीत

"शिवसेना आणि भाजप हे पंचवीस वर्षे एकत्र होते तेव्हा अमित शहा राजकारणात नसावेत. 1978 साली जनसंघाच्या मदतीने शरद पवार प्रथम मुख्यमंत्री झाले व पवारांच्या मंत्रिमंडळात जनसंघ होता तेव्हाही बहुधा अमित शहा ‘चड्डी’त फिरत असतील. ही नातीगोती होतीच. आता ज्यांना महाविजयाचा उन्माद चढला आहे त्यांनी सत्य जाणून घेतले पाहिजे ते म्हणजे उद्धव ठाकरे व शरद पवार यांचा पराभव भारतीय जनता पक्षाने केला नाही. भाजपचा महाविजय कसा झाला हे समजून घ्यायचे असेल तर शहा यांनी सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीत जाऊन तेथील लोकांशी बोलायला हवे. ईव्हीएम मतदानाविरुद्ध या गावाने बंड केले व बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी गाव स्वतःच सज्ज झाले तेव्हा गावात केंद्रीय पोलीस बळ लावून 144 कलम लादण्यात आले. भारताचा निवडणूक आयोग सच्चा असता आणि अमित शहांच्या पक्षाला झालेल्या मतदानावर विश्वास असता तर त्यांनी ही दहशत व पळपुटेपणा दाखवला नसता. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी देशातील निवडणुका ‘बॅलेट पेपर’वर घ्यायला हव्यात. मोदी-शहा हे धाडस कधीच दाखवणार नाहीत," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

बोगस मतदार यादीवर काम करण्यासाठी संघाचे लोक...

"भाजप व त्यांचे तथाकथित मित्रपक्ष कसे महाविजयी झाले त्याचे प्रात्यक्षिक देशाच्या जनतेने परळी विधानसभेत पाहिले. हातात पिस्तुले, काठ्या व तलवारी घेऊन ‘मुंडे’ यांचे लोक मतदान केंद्रावर बाहेर उभे होते व त्यांनी लोकांना मतदान करू दिले नाही. महाराष्ट्रातील 95 विधानसभांची यंत्रणा अशा पद्धतीने ताब्यात घेऊन भाजपने महाविजय प्राप्त केला व या झुंडशाहीचे गुणगान देशाचे गृहमंत्री साई दरबारात येऊन करतात. आता याच झुंडशाहीच्या बळावर अमित शहा यांनी ‘शत-प्रतिशत भाजप’चा नारा दिला आहे. त्यामुळे अजित पवार व एकनाथ शिंदे यांचे गट काय करणार? त्यांचे भविष्य काय? मतदार यादीतल्या खऱ्या मतदारांची नावे वगळून प्रत्येक बूथनुसार 100-150 बोगस मतदार घालायचे व अशा पद्धतीने प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील यादीत 25-30 हजार बोगस मतदारांचा घोळ करणारे ‘वर्कशॉप’ भाजपने काढले आणि त्या जोरावर ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ हा कार्यक्रम राबवला. या बोगस मतदार यादीवर काम करण्यासाठी संघाचे लोक नेमले. हे भाजपच्या महाविजयाचे गणित आहे व एखादा व्यापारी वृत्तीचा राजकारणीच हे बोगस काम करू शकतो," असा टोला ठाकरेंच्या पक्षाने लगावला आहे.

...म्हणून ट्रम्प यांच्या शपथग्रहण सोहळ्यास मोदींना आमंत्रण नाही

"महाराष्ट्रात नव्हे, तर भारतात विरोधी पक्ष औषधालाही शिल्लक ठेवणार नाही, गावपातळीपासून संसदेपर्यंत भाजपच जिंकेल, विरोधकांना एकही जागा मिळू देणार नाही, असा निर्धार अमित शहांनी केला. म्हणजे ही एक प्रकारे दहशती राजकारणाची तुतारीच त्यांनी फुंकली. पंतप्रधान मोदी यांनी लोकशाहीला मारणारे, स्वातंत्र्याचा गळा घोटणारे राजकारण भारतात सुरू केल्यानेच अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांच्या शपथग्रहण सोहळ्यास मोदी यांना आमंत्रित केले नाही ही वस्तुस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. भारतीय स्वातंत्र्य, लोकशाही व संविधानाशी दगाबाजी सर्वच पातळ्यांवर चालली आहे. मोदी-शहा यांचे राजकारण उद्योगपती अदानी यांच्या हिताचे आहे. त्यासाठी देशाच्या तिजोरीवर रोज हल्ला होतोय. भारतमातेशीच ही दगाबाजी आहे. त्याच भारतमातेला अपमानित करून अमित शहा महाराष्ट्रात दगाबाजीवर प्रवचने झोडत आहेत," अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे.

ठाकरे-पवारांनी संकटकाळात मोदी-शहांना मदत केली

"अमित शहा हे चाणक्य किंवा बलवान नाहीत. त्यांच्या भुजांत व मस्तकात ईडी, सीबीआयचे बळ नसते तर अमित शहांना कोणीच विचारले नसते. दुसरे असे की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांनी त्यांच्या संकटकाळात मोदी-शहांना मदत केली. त्याचे पांग त्यांनी दोघांचे पक्ष फोडून फेडले. ही दगाबाजी नाही काय? महाराष्ट्र हा सभ्य, सुसंस्कृत व स्वाभिमानाच्या राजकारणाबद्दल ओळखला जातो. अमित शहांच्या राजकारणाने महाराष्ट्राच्या सभ्यतेवर दुर्गंधीच्या पिचकाऱ्याच टाकल्या. एकेकाळी छत्रपती शिवरायांना जन्म देणाऱ्या या महाराष्ट्रात अमित शहांनी ‘गां*’ आणि ‘गांडुळां’ची पैदास केली हे त्रिकालाबाधित सत्य आहे, पण या जगात कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नाही व स्वतः अमित शहादेखील अमृत प्राशन करून जन्माला आलेले नाहीत. राम-कृष्णही आले गेले, तेथे तुम्ही कोण?" असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.