एकीकडे थंडी वाढणार तर राज्यातील 'या' भागात पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो वाचा

Maharashtra Weather Update: राज्यात थंडी पुन्हा एकदा परतली असली तरी काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 14, 2025, 07:03 AM IST
एकीकडे थंडी वाढणार तर राज्यातील 'या' भागात पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो वाचा title=
Maharashtra Weather aert news mumbai vidarbha kokan temprature to drop down and predict unseasonal rain

Maharashtra Weather Update: राज्यात पुन्हा एकदा गारठा वाढला आहे. मात्र त्याचबरोबर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. थंड वाऱ्याचा जोर जास्त राहिल्यास उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भात किमान पारा खाली जाण्याचा अंदाज आहे. 

बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात दोन दिवस ढगाळ हवामान राहण्याचा आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरावरून प्रामुख्याने दक्षिण विदर्भ, दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात बाष्पयुक्त वारे येत आहेत. त्यामुळे या भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रातील काही भागातील थंडीदेखील या बाष्पयुक्त वाऱ्यामुळं कमी झाली आहे. साधारण पुढील चार दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर मंगळवारी (१४ जानेवारी आणि बुधवारी (१५ जानेवारी) विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

हिमालयात बुधवारपासून (१५ जानेवारी) पश्चिमी विक्षोप (थंड वाऱ्याचा झंझावात) सक्रीय होण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम म्हणून उत्तर भारतात पुन्हा थंडीत वाढ होण्याचा अंदाज आहे. थंड वाऱ्याचा जोर जास्त राहिल्यास उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भात किमान पारा खाली जाण्याचा अंदाज आहे. श्रीलंका आणि भारत दरम्यान असलेल्या कोमेरिन भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर भारतात 100 नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत. त्यामुळं थंडी कमी-अधिक होत असून दाट धुक्याचे साम्राज्य कायम आहे.