Navi Mumbai Cidco: सिडकोचे एक घर असताना नवी मुंबई शहरात दुसरे घर विकत घेता येत नाही, असा सिडकोचा नियम आहे. मात्र आता या नियमात बदल करण्याचा विचार सिडकोने केला आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी तसे संकेत दिले आहेत.
नवी मुंबईत सिडकोने काढलेल्या 'माझे पसंतीचे घर' या योजनेत देण्यात आलेल्या घरांच्या किमती जास्त असल्याने त्या किमती कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असून मुख्यमंत्रीसोबत याबाबत बोलणार असून सिडकोची दोन घरे घेता यावीत यासाठी सिडकोच्या बोर्ड मिटींगमध्ये प्रस्ताव ठेवणार असल्याचे सिडको अध्यक्ष आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी सांगितले आहे.
सिडकोच्या माध्यमातून विविध घटकांसाठी 87 हजार घरे बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यापैकी 41 हजार घरांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. सिडकोचे घर घेण्यासाठी अनेक अटी व शर्ती लागू आहेत. पती किंवा पत्नीच्या नावे नवी मुंबई शहरात घर असेल तर सिडकोचे घर घेता येत नाही. ही अट कधी कधी सर्वसामान्यांसाठी जाचक वाटते.
सिडकोच्या नियमानुसार दुसरे घर घेता येत नसल्याने अनेकांना गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन ही अट शिथिल करण्याचा निर्णय सिडको घेऊ शकते. त्यामुळं आधीच नावावर एक घर असेल तरी आता सिडकोचे दुसरे घर घेता येणार आहे. सिडकोच्या २६ हजार घरांची योजना सुरू आहे. एका घराच्या अटीमुळे अनेकांनी ऑनलाइन अर्ज नोंदणी केलेली नाही. ती शिथिल झाल्यास दुसऱ्या कुटुंबीयांना दिलासा मिळणार आहे. त्याचप्रमाणे सिडकोच्या घरांची विक्रीसुद्धा वाढणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
सिडकोने 26 हजार घरांची योजना जाहीर केली यासाठी तब्बल एक लाख 20 हजार नागरिकांनी अर्ज केले आहेत. या घरांच्या किमती नुकत्याच जाहीर करण्यात आल्या असून किमती 25 लाख ते 97 लाख पर्यत जात आहे. विभागानुसार हे दर लावले आहेत यात तळोजा नोंडमध्ये सर्वात कमी म्हणजे 25 लाखांत वन बीएचकेला दिला आहे. तर तोच वन बीएचके वाशीमध्ये 74 लाखांत उपलब्ध करून दिला आहे. यातही सिडकोने याआधी विक्री न गेलेली सहा हजार घरांची दर कमी करून दिले आहेत. यात फक्त तळोजामध्ये चार हजार घरे ही आधीच्या गृहप्रकल्पातील आहेत यामुळे ही घरे 25 ते 35 लखांमध्ये उपलब्ध करून दिली आहे.