www.24taas.com, मुंबई
मोबाईलवर गेम खेळायला, चॅटींग करायला, गाणी ऐकायला खूप आवडतं... लांबच्या प्रवासात तर हे अॅप्लिकेशन्स नक्कीच सोबत करतात... पण, बॅटरी संपली तर? हा प्रश्न डोक्यात आल्यावर नाखुशीनंच सगळी अॅप्लिकेशन्स बंद करायला लागतात, होय ना! पण, आता मात्र ही काळजी करण्याची तुम्हाला गरज उरणार नाही.
अँड्रॉईड, विंडोज स्मार्टफोन युझर्सना भेडसावणाऱ्या बॅटरीच्या समस्येवर लंडनमधील `बफेलो ग्रीड` या कंपनीने विकसित केलेल्या `सोलर पॉवर चार्जिंग स्टेशन`नं नामी तोडगा शोधून काढलाय. यासाठी तुम्हाला करावा लागणार आहे, फक्त एसएमएस... आणि तुमचा मोबाईल आपोआप रिचार्ज होईल. आहे की नाही गंमत!
यामध्ये `मॅक्झिमम पॉवर पाँइंट ट्रकींग` (एमपीपीटी) तंत्रज्ञानाचा वापर करून ६० वॅटच्या सोलर पॅनलद्वारे बॅटरी चार्ज केली जाते. एमपीपीटी हे तंत्रज्ञान वेगवेगळ्या तपमानात व हवामानात या सोलर पॅनेलमधून जास्तीत जास्त ऊर्जा उपलब्ध करते. ग्राहकाने पाठवलेला एसएमएस उपकरणाला मिळताच बॅटरीच्या सॉकेटवर बसविण्यात आलेली एलईडी ब्लिंक होते आणि मोबाइल चार्जिंग सुरू होते.
एका एसएमएसवर दीड तासांचे बॅटरी बॅकअप मिळते. `बफेलो ग्रीड`चे हे उपकरण पूर्णपणे सोलर चार्ज असेल तर चार्जिंग तीन दिवस टिकते. यातून ३० ते ५० फोन सहज चार्ज होऊ शकतात. सध्या एसएमएससाठी ११० शिलिंग इतके पैसे मोजावे लागतात. मात्र, भविष्यात या उपकरणाचा वापर वाढल्यास एसएमएस आणि उपकरणाची किंमतही कमी होईल, असे `बफेलो ग्रीड`चे डॅनियल ग्रिंड यांनी सांगितले.
आफ्रिका आणि आशियातील ग्रामीण भागात ज्या ठिकाणी वीज नसते, अशा ठिकाणी सहज मोबाइल चार्ज करण्यासाठी हे उपकरण विकसित करण्यात आलंय. मात्र, शहरातील स्मार्टफोनच्या वेगाने डाऊन होणाऱ्या बॅटरीवरही हे उपकरण उपयोगी ठरणार आहे. या तंत्रज्ञानाची युगांडा येथे नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आली.