मायक्रोमॅक्सचा नवीन टॅबलेट बाजारात

मोबाईल हँडसेट बनवणाऱ्या मायक्रोमॅक्स कंपनीनं आता आणखी एक पाऊल पुढे टाकत एक नवीन टॅबलेट बाजारात आणलाय. १०.१ इंचाच्या या टॅबलेटची किंमत आहे ९,९९९ रुपये.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 18, 2012, 09:11 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
मोबाईल हँडसेट बनवणाऱ्या मायक्रोमॅक्स कंपनीनं आता आणखी एक पाऊल पुढे टाकत एक नवीन टॅबलेट बाजारात आणलाय. १०.१ इंचाच्या या टॅबलेटची किंमत आहे ९,९९९ रुपये.
मायक्रोमॅक्सचे मुख्य अधिकारी दीपक मेहरोत्रा यांनी या टॅबलेटची माहिती देताना म्हटलंय की, ‘आम्ही ७ इंचाचा हा नवा टॅबलेट बाजारात आणलाय. फक्त १०० दिवसांत तब्बल १.४ लाख यंत्र विकले आहेत. त्यामुळेच आम्हाला खात्री आहे की हा नवा १०.१ इंचाचा हा टॅबलेटही मार्केटमध्ये चांगलं प्रदर्शन करून दाखवू शकेल.’
मल्टी टचस्क्रीन असलेल्या या टॅब्लेटमध्ये १०८० पिक्सेल क्षमतेचा हाय डेफिनिशन व्हिडिओ प्लेबॅक आहे. टॅब्लेटची क्षमता ८ जीबी असून ती ३२ जीबीपर्यंत वाढविता येणे शक्य आहे. या १.२ क्षमतेचा कोअर डयुओ ए ८ प्रोसेसर असून मेमरी १ जीबीची आहे. इंटरनेटसाठी टाटा फोटॉन व ३ जी डॉंगलची सुविधा उपलब्ध आहे.
या महिन्यात मायक्रोमॅक्स या नवीन टॅबलेटसोबतच आणखी ७ इंचाचे दोन टॅबलेट सादर करणार आहे, त्यामुळे ग्राहकांनाही पर्याय उपलब्ध असणार आहेत.