मयप्पन - राज कुंद्रावर आजीवन बंदी, CSK आणि RR वरही दोन वर्षांची बंदी

माजी न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली 'आयपीएल स्पॉट फिक्सिंग' प्रकरणात सुप्रीम कोर्टानं नेमलेल्या समितीनं आज आपला निर्णय जाहिर केलाय. 

Updated: Jul 14, 2015, 02:16 PM IST
मयप्पन - राज कुंद्रावर आजीवन बंदी, CSK आणि RR वरही दोन वर्षांची बंदी title=

नवी दिल्ली : माजी न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली 'आयपीएल स्पॉट फिक्सिंग' प्रकरणात सुप्रीम कोर्टानं नेमलेल्या समितीनं आज आपला निर्णय जाहिर केलाय. फिक्सिंग दोषी आढळलेल्या चेन्नई सुपरकिंग्जचा टीम प्रिन्सिपल गुरूनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचा मालक राज कुंद्रा यांच्यावर माजी न्यायमूर्ती लोढा समितीनं आजीवन बंदी घातलीय. तर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या टीम्सवरही दोन वर्षांची बंदी घालण्यात आलीय. 

गुरुनाथ मयप्पनवर आजीवन बंदी
'चेन्नई सुपरकिंग्ज'चा सीईओ असलेल्या मयप्पननं बीसीसीआयच्या मूलभूत नियमांचं उल्लंघन केलं. मयप्पनमुळे क्रिकेटच्या प्रतिमेला तडा गेला. मयप्पननं बेटिंग केल्याचं सिद्ध झालंय... तो सट्टा खेळला पण त्याचं 'बॅड लक' यात त्याला पैसा कमावता आला नाही... मयप्पननं या सट्टेबाजीत ६० लाख रुपये गमावले. 

क्रिकेट संबंधित कोणत्याही प्रकारच्या सामन्यात किंवा कार्यक्रमात सहभागी होण्यास मयप्पनवर आजीवन बंदी घालण्यात येत असल्याचं समितीनं म्हटलंय. 

सोबतच, श्रीनिवासची कंपनी इंडिया सिमेंटसवरही बॅन लावण्याची शिफारस समितीनं केलीय.  

राज कुंद्रावरही आजीवन बंदी
राजस्थान रॉयल्सचा सह मालक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा हादेखील क्रिकेटमध्ये चुकीच्या गतिविधींमध्ये समाविष्ट असल्याचं आढळलंय. यूकेचं नागरिकत्व असलेला राज कुंद्राही स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळलाय. त्यानं बीसीसीआय आणि क्रिकेटची प्रतिमा मलिन केलीय. यामुळे त्याच्यावरही क्रिकेटसंबंधी कोणत्याही प्रकारे सहभागी होण्यास आजीवन बंदी घालण्यात आलीय. 

राजस्थान रॉयल्सचे तीन क्रिकेटर्सही फिक्सिंगमध्ये सहभागी होते. आयपीएलमध्ये सर्व काही आलबेल सुरू असल्याचीच ही चिन्हं आहेत. सध्या, राज कुंद्रा राजस्थान रॉयल्सचा भाग नसले तरी फ्रेंचाईजची जबाबदारी कमी होत नाही. 

त्यामुळेच, लोढा समितीनं महेंद्र सिंग धोनीच्या टीमवरही दोन वर्षांची बंदी जाहीर केलीय. त्यामुळे, आता ही टीम आयपीएलच्या बाहेर फेकली गेलीय. धोनीची टीम दोन वर्षांपर्यंत मॅच खेळू शकणार नाही..  
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.