पुणे : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारतानं तीन विकेटनं विजय मिळवला आहे. भारताच्या या विजयाचे शिल्पकार ठरले ते कॅप्टन विराट कोहली आणि केदार जाधव. या दोघांनी झळकवलेल्या झुंजार खेळीमुळे भारतानं अशक्य वाटणारं असं 351 रनचं लक्ष्य अगदी सहज पार केलं.
351 रनचा पाठलाग करताना भारताची अवस्था 4 बाद 63 अशी असताना कोहली आणि जाधवनं 200 रनची पार्टनरशीप केली. विराट कोहलीची ही वनडे क्रिकेटमधली 27वी तर केदार जाधवची दुसरी सेंच्युरी होती. कोहलीच्या 105 बॉलमध्ये बनवलेल्या 122 रनच्या खेळीमध्ये 8 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता. तर केदार जाधवनं फक्त 76 बॉलमध्ये 120 रन ठोकून काढल्या.
विराट कोहली आणि केदार जाधव आऊट झाल्यानंतर भारतीय टीम पुन्हा एकदा अडचणीत सापडली होती पण हार्दिक पांड्यानं 37 बॉलमध्ये 40 रन केल्या आणि भारताला 3 विकेट आणि 11 बॉल राखून जिंकवून दिलं.