Delhi School News: गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीतील काही शाळांना धमकीचे ईमेल आले होते. शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. आता या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. पोलिसांनी म्हटलं आहे की, जवळपास 3 शाळांना धमकीचा ई-मेल आला होता. हा ई-मेल त्यांच्याच शाळेतील विद्यार्थ्यांनी केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. यात एक व्यंकटेश्वर ग्लोबल शाळेचाही समावेश होता. 28 नोव्हेंबर रोजी रोहिणी प्रशांत विहार पीव्हीआर मल्टिप्लेक्समध्ये स्फोटाची घटना घडल्यानंतर त्यानंतर दुसऱ्या दिवशी व्यंकटेश्वर शाळेला धमकीचा ईमेल आला. पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शाळेतच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा ईमेल केला होता. परीक्षा स्थगित करण्यासाठी त्यांनी हा इमेल केला होता.
अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे, काउंसलिंग दरम्यान, दोन्ही विद्यार्थ्यांनी हा खुलासा केला आहे. शाळेला धमकी देण्याचा हा विचार त्यांच्या डोक्यात मागील घटनांमधून आला. विद्यार्थ्यांच्या पालकांना याबाबत माहिती देत या शाळेप्रमाणेच रोहिणी आणि पश्चिम विहार येथील दोन शाळांनाही विद्यार्थ्यांनीच धमकी दिल्याचे समोर आले आहे. शाळा बंद राहावी, यासाठी विद्यार्थ्यांनी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.
शाळेत बॉम्ब असल्याच्या धमकीमुळं 11 दिवस दिल्लीतील शाळांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. पोलिसांनी म्हटलं आहे की, ईमेल व्हीपीएनच्या माध्यमातून पाठवण्यात आला होता. त्यामुळं अधिकाऱ्यांना हे शोधून काढणे आव्हानात्मक ठरलं होतं. या वर्षी मेनंतर दिल्लीत 50हून अधिक बॉम्बस्फोटाच्या धमक्या मिळाल्या होत्या. फक्त शाळाच नाही तर रुग्णालय, विमानतळ आणि एअरलाइन कंपन्यांनाही अशा धमक्या देण्यात आल्या होत्या.