India Forest Status: भारतीयांसाठी एक आनंदाची माहिती समोर येत आहे. संपूर्ण जग प्रदूषणाच्या विळख्यात सापडलं आहे. याचा परिणाम वातावरण बदलावर होत आहे. त्यामुळं नैसर्गिक संकटाचा सामना सर्वच जण करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग हा चिंतेचा विषय असतानाच भारतासाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या 'इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट २०२३' नुसार भारतातील वन आणि झाडांचे क्षेत्र २०२१ च्या तुलनेत २०२३ मध्ये १,४४५ चौरस किमीने वाढले आहे. जग ग्लोबल वॉर्मिंगने होरपळत असताना भारतात मात्र हिरवळत वाढत आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी ही माहिती दिली आहे.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते देहरादून येथील वनसंशोधन संस्था येथे या रिपोर्टचे प्रकाशन करण्यात आले. या भारतीय वन सर्वेक्षण (एफएसआय) द्वारे हा अहवाल तयार केला जातो. उपग्रह रिमोट सेन्सिंग डेटा आणि क्षेत्र-आधारित राष्ट्रीय वनसूचीच्या आधारे देशातील वन आणि वृक्षांच्या संसाधनांचे एफएसआय सखोल मूल्यांकन करते.
देशात वनक्षेत्रात वाढ झाली असून २०२१च्या तुलनेत देशात एकूण वन आणि वृक्षक्षेत्रात एक हजार ४४५ चौ. किमी वाढ झाली असून, ज्यामध्ये वनक्षेत्रात १५६ चौ. किमी आणि वृक्षक्षेत्रात एक हजार २८९ चौ. किमी वाढ झाली आहे. या अहवालानुसार देशातील एकूण वन आणि वृक्ष क्षेत्र ८,२७,३५७ चौ. किमी (देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २५.१७%) आहे. यामध्ये वन क्षेत्र ७,१५,३४३ चौ. किमी (२१.७६%) असून वृक्ष क्षेत्र १,१२,०१४ चौ. किमी (३.४१%) आहे.
देशभरातील वनक्षेत्रात वाढ झाल्याचे समाधानकारक चित्र समोर आले असतानाच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागला आहे. मध्य प्रदेश प्रथम, अरुणाचल प्रदेश द्वितीय स्थानी आहेत.