भारताला आज बॉक्सिंगमध्ये पदकाची आशा

सर्व प्रशासकीय समस्यांना बाजूला सारत भारतीय बॉक्सर्स आज रिंगणात उतरतील. रिओ ऑलिम्पिकसाठी भारताकडून फक्त 3 बॉक्सर्स पात्र ठरले आहेत. याआधी लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचे 8 बॉक्सर्स सहभागी झाले होते. शिवा थापा (64 किलो), विकास कृष्ण यादव (75 किलो), मनोज कुमार (64 किलो) हे तिघे आज भारताचं प्रतिनिधित्त्व करतील.

Updated: Aug 9, 2016, 07:04 PM IST
भारताला आज बॉक्सिंगमध्ये पदकाची आशा title=

रिओ दी जेनेरो : सर्व प्रशासकीय समस्यांना बाजूला सारत भारतीय बॉक्सर्स आज रिंगणात उतरतील. रिओ ऑलिम्पिकसाठी भारताकडून फक्त 3 बॉक्सर्स पात्र ठरले आहेत. याआधी लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचे 8 बॉक्सर्स सहभागी झाले होते. शिवा थापा (64 किलो), विकास कृष्ण यादव (75 किलो), मनोज कुमार (64 किलो) हे तिघे आज भारताचं प्रतिनिधित्त्व करतील.

खरंतर भारताच्या बॉक्सिंग संघाला अनेक प्रशासकीय समस्यांनी ग्रासले आहे. गेल्या वर्षीपासून सिनीयर स्तरावर राष्ट्रीय सामने झालेले नाहीत. शिवाय देशाकडे राष्ट्रीय महासंघ नसल्याने खेळाडूंना परदेशात खेळण्याची संधीदेखील मिळालेली नाही. यामुळे संघाच्या ऑलिम्पिक तयारीवर परिणाम झाला आहे.

2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या एरोल स्पेंसविरूद्ध विकास कृष्णला विजयी घोषित करण्यात आले होते. पण स्पेंसने तांत्रिक आधारावर अपील केल्याने विकासला पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळच्या आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न आज विकास करेल. बॉक्सिंगमध्ये रँकींग मिळवणारा विकास हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. मिडलवेट वर्गात तो 7 व्या स्थानावर आहे. 75 किलो वजनी गटात विकास जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे.

विकासचा पहिला सामना 18 वर्षीय चार्ल्स एल्बर्ट शोन कोनवेल याच्याशी होईल. चार्ल्स प्रथमच ऑलिम्पिकमध्ये खेळत आहे. तर 24 वर्षीय विकास ऑलिम्पिकमध्ये अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे गतवेळाच्या कटू आठवणी विसरत विकास आज विजय खेचून आणेल अशी आशा आहे.

शिवा थापा 64 किलो वजनी गटात जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. पण समितीकडून झालेल्या काही चुकांमुळे त्याला रँकींग मिळालेले नाही. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघाच्या नियमानुसार व्यावसायिक बॉक्सिंग आणि वर्ल्ड सिरिज बॉक्सिंगमधील कामगिरी यांच्या आधारावर रँकींग दिले जाते. पण बॉक्सिंग समितीने या नियमाची माहिती शिवाला दिली नव्हती. त्यामुळे त्याने व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये भाग घेतला नव्हता. आता शिवाचा सामना पहिल्या फेरीतील मानांकीत खेळाडूशी होईल.

2010 च्या राष्ट्रकुल स्पर्धेचा विजेता मनोज कुमारचा सामना लिथुआनियाच्या इवाइडास पेट्रायस्कासशी होईल. पेट्रायस्कास हा लंडन ऑलिम्पिकमध्ये 60 किलो वजनी गटाचा विजेता आहे.