कराची : पाकिस्तानचे दिग्गज क्रिकेटपटू हानिफ मोहम्मद यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केल्यानंतर ते पुन्हा एकदा जिवंत झाले आहेत. सहा मिनिटांसाठी हानिफ मोहम्मद यांच्या हृदयाचे ठोके बंद झाले होते, त्यामुळे डॉक्टरांनी ही घोषणा केली, पण अचानक त्यांच्या हृदयाचे ठोके सुरु झाल्यामुळे त्यांच्यावर पुन्हा उपचाराला सुरुवात करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून हानिफ मोहम्मद कॅन्सरनं त्रस्त आहेत. या आठवड्यामध्ये त्यांची तब्येत आणखी खराब झाल्यामुळे त्यांना व्हॅन्टिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.
81 वर्षांच्या हानिफ मोहम्मद यांना मागच्या महिन्यात आगा खान हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं होतं. तीन वर्षांपूर्वी त्यांना फुफुसाचा कॅन्सर असल्याचं समोर आलं होतं.
जुनागडमध्ये हानिफ यांचा जन्म झाला होता. पाकिस्तानसाठी त्यांनी 55 टेस्टमध्ये 43.98 च्या सरासरीनं 3,915 रन केल्या होत्या. पाकिस्तानकडून एका इनिंगमध्ये सर्वाधिक रन बनवण्याचा विक्रम आजही हानिफ मोहम्मद यांच्या नावावर आहे.
हानिफ मोहम्मद यांनी एका इनिंगमध्ये 337 रन बनवल्या होत्या. हानिफ यांच्यानंतर इंझमाम उल हक(329 ) आणि युनूस खान (313) या दोन क्रिकेटपटूंनी पाकिस्तानसाठी ट्रिपल सेंच्युरी झळकावली आहे. 1968 मध्ये हानिफ मोहम्मद यांना विस्डन क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार मिळाला होता.