सरफराज कसा झाला क्रिकेटर ?

आयपीएलच्या नवव्या मोसमात सनरायजर्स हैदराबादविरुद्ध खेळताना बैंगलोरच्या सरफराज खाननं 10 बॉलमध्ये 35 रन बनवले.

Updated: Apr 15, 2016, 08:01 PM IST
सरफराज कसा झाला क्रिकेटर ? title=

मुंबई: आयपीएलच्या नवव्या मोसमात सनरायजर्स हैदराबादविरुद्ध खेळताना बैंगलोरच्या सरफराज खाननं 10 बॉलमध्ये 35 रन बनवले. या खेळीनंतर सरफराजवर दिग्गज खेळाडूंनी कौतुकाचा वर्षाव केला. क्रिस गेल, विराट कोहली, शेन वॉटसन आणि डेव्हिड वॉर्नर सरफराजचे फॅन झाले आहेत. 

सरफराजच्या वडिलांची जिद्द

पण सरफराजच्या क्रिकेटर बनण्यामागे त्याचा वडिलांच्या जिद्दीची कहाणी आहे. सरफराजचे वडिल नौशाद हे इक्बाल अब्दुल्ला नावाच्या स्पिनरला उत्तर प्रदेशमधून मुंबईमध्ये घेऊन आले. सरफराजच्या वडिलांनी इक्बालला क्रिकेट खेळायला शिकवलं, यानंतर इक्बाल भारतासाठी अंडर 19 क्रिकेट आणि आयपीएलही खेळला. पण नौशादना जेव्हा इक्बालची गरज होती तेव्हा त्यानं टोमणा मारला. 

माझ्यामध्ये गुणवत्ता होती म्हणून मी खेळलो, तुमच्यामध्ये गुणवत्ता असेल तर तुमच्या मुलाला खेळवून दाखवा, असं इक्बाल नौशाद यांना म्हणाला. 

तो टोमणा बोचला

इक्बालचं हे उत्तर ऐकून नौशाद यांना वाईट वाटलं, आणि त्यांनी सरफराजला क्रिकेटर करण्याचा विडा उचलला. भारताच्या अंडर 19 टीमकडून खेळताना सरफराजनं 33 वनडेमध्ये 1080 रन बनवल्या आहेत. यामध्ये 1 सेंच्युरी आणि 11 हाफ सेंच्युरीचा समावेश आहे.