www.24taas.com, मुंबई
‘बिग बॉस’चं नवे पर्व पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येत्या सात ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या पर्वाबद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. ‘बिग बॉस -६’चं मुख्य आकर्षण म्हणजे या पर्वात सेलिब्रटींऐवजी सामान्य माणसे स्पर्धक म्हणून दिसणार आहेत. बॉलिवूडचा सुप्रसिध्द अभिनेता सलमान खान “ बिग बॉस“चं सलग तिसऱ्यांदा निवेदन करत आहे. अजूनही प्रदर्शित न झालेला हा कार्यक्रम शिफारशीच्या मुद्द्यावरून वादविवादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
सलमानने बिग बॉसच्या नव्या सीझनबद्दल बोलताना सांगितलं, की कार्यक्रमात स्पर्धकांना सहभागी करण्यात त्याची कुठल्याही प्रकारची भूमिका नाही. “मला कुठल्याही प्रकारचा भेदभाव करायला आवडत नाही त्यामुळे मी कोणाचीही शिफारस करणार नाही. कोणते स्पर्धक सहभाही होणार आहेत हे मला शेवटच्या क्षणाला पाहयला आवडेल.” असं सलमान म्हणाला.
बिग बॉस-५ हे पर्व मनसे आणि चॅनल यांच्यात झालेल्या राजकीय वादामुळे चर्चेत आले होते. शिवसेनेनेही बिग बॉस-५ पर्वातील विदेशी कलाकारांच्या सहभागावर आक्षेप घेतला होता. तसंच या पर्वात पॉर्नस्टार सनी लिऑनला सहभागी करून घेतल्याबद्दल या कार्यक्रमावर सर्व थरांतून टीका झाली होती. त्यामुळे बिग बॉसचं नवं पर्व अशाच कुठल्या वादात अडकेल का, हे येत्या सात ऑक्टोबरलाच कळेल.