www.24taas.com,चिपळूण
चिपळूण इथं होणा-या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला लागलेलं वादाचं ग्रहण अजूनही संपत नाहीय. आता तर साहित्य संमेलनाची ओळख असलेली ग्रंथदिंडीच रद्द करण्याची नामुष्की संमेलन आयोजकांवर आलीय.
साहित्य संमेलन मंडपाच्या एका प्रवेशद्वाराला लेखक,विचारवंत हमीद दलवाई यांचे नाव देऊन ११ जानेवारीला त्यांच्या मिरजोळी या गावातल्या घरापासून ग्रंथदिंडी काढण्यात येणार होती. मात्र या दिंडीला आणि प्रवेशद्वाराला हमीद दलवाई यांचे नाव देण्यास सामाजिक कार्यकर्ते शाहनवाझ हुसेन, सीरत कमिटी, सहारा वेलफेयर सोसायटीच्या पदाधिका-यांसह मुस्लिम बांधवांनी विरोध केलाय.
हा विरोध लक्षात घेऊन ग्रंथदिंडी रद्द केल्याचं संयोजन समितीचे कार्यवाहक प्रकाश देशपांडे यांनी जाहीर केलंय. हमीद दलवाई हे मुस्लिम समाजाचे असले तरी मुस्लिम समाजामध्ये त्यांनी कोणत्या सुधारणा घडवून आणल्या असा प्रश्न विरोध करणा-यांनी उपस्थित केलाय.
दरम्यान, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरेंचच नाव देण्यात येणार असून त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही तसंच आक्षेप असणा-या सर्वांशी बोलणी करून वाद मिटविण्याचे प्रयत्नही आम्ही करत असल्याची प्रतिक्रिया साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुनील तटकरेंनी दिली. आणि वेळप्रसंगी शिवसेना नेत्यांशीही याबाबत चर्चा केली जाईल असे संकेतही त्यांनी दिलेत. ते नाशिकमध्ये बोलत होते.
साहित्य संमेलनाकडून साहित्याचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांच्या अनेक अपेक्षा आहेत. साहित्य संमेलनात होणारे वाद हे दुर्दैवी असल्याची खंत हे विद्यार्थी व्यक्त करत आहेत.