www.24taas.com, यशवंतराव चव्हाणनगरी,चिपळूण
८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले. या संमेलनात जवळपास सात ठराव मांडण्यात आले. यात मराठी भाषा आणि मराठी शाळा संर्वधनासाठी प्रयत्न करावेत. तर बेळगाव सीमा प्रश्न आणि मराठवाड्याचा पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी ठोस उपाय-योजना करण्याचे सूचविण्यात आलेय. तर कोकणातील जैतापूरच्या विस्थापितांबाबत शासनाने पुन्हा विचार करावा, असे मत संमेलन अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.
तीन दिवस भरलेल्या या संमेलनाचे सूप रविवारी वाजले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा सौ. उषा तांबे, स्वागताध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अन्य मान्यवर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संमेलनाचे अध्यक्ष कोत्तापल्ले म्हणाले, साहित्य संमेलन हे कोणा एकाचे नव्हे, तर निधर्मी व्यासपीठ आहे. ते अधिकाधिक निधर्मी होण्यासाठी, जातीधर्मनिरपेक्ष होण्यासाठी या पुढील काळात साहित्य महामंडळाने सजग राहिले पाहिजे. साहित्य संमेलन म्हणजे भाषेचा उत्सव असतो. तो उधळून लावण्याचे कोणी मनात आणू नये. साहित्यामध्ये वेगवेगळ्या विचारप्रवाहांचे लेखक असतात. त्यामुळे या संमेलनाला झालेला विरोध हा प्रतीकात्मक आहे. साहित्य महामंडळाने व्यापक, समंजस होऊन कळीचे मुद्दे चर्चेला घेतले, तर वादाचे प्रसंग निर्माण होणार नाहीत.
संमेलनात सर्वांना सामावून घ्यावे आणि यापुढे धार्मिक प्रतीके वापरू नयेत. एकंदरीत, सांस्कृतिक प्रतीकांचा अभ्यास झाला पाहिजे. संमेलनाच्या व्यासपीठावरून संयुक्त महाराष्ट्र, बेळगाव, कारवार सीमा प्रश्नअ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे विद्यापीठ व्हावे, असे अनेक ठराव मांडले गेले. त्याची कार्यवाही नंतर झाली. विरोध करणाऱ्यांनी बाहेर न राहता आत यावे आणि या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन कोत्तापल्ले यांनी केले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या अनुपस्थितीमुळे प्रमुख पाहुणे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे होते. त्यांनी सुनील तटकरे यांच्यावर हल्ला चढविला. त्यानंतर तटकरे यांनीही जशाच तसे उत्तर दिले. त्यामुळे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. तर संमेलनाचे प्रमुख निशिकांत जोशी यांनी संमेलनाबाबत अपप्रचार केल्याची खंत व्यक्त केली. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी संमेलन यशस्वी झाल्याची ग्वाही दिली.
यांनी दिला ठेंगा?
संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, उद्योगमंत्री नारायण राणे, पालकमंत्री भास्कर जाधव, खासदार हुसेन दलवाई, खासदार नीलेश राणे या प्रमुख राजकीय व्यक्तींसह ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर उपस्थित नव्हते.
आगामी संमेलन कुठे होणार याची उत्सुकता आहे. दरम्यान, आगामी साहित्य संमेलनाचे निमंत्रण पिंपरी-चिंचवडमधील ‘साहित्य संवर्धन` या संस्थेकडून आल्याचे स्पष्ट केले. यासंदर्भातील निर्णय ३१ मार्चनंतर होणार आहे.
कोणते आहेत ठराव?
- महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी न्यायालयात कामकाज मदतीसाठी सल्लागार समिती हवी
- मराठीतील उत्तम साहित्य अनुवादित होण्यासाठी अनुदान द्यावे
- ग्रंथालय कायद्यात बदल करावा. पत्की समितीच्या शिफारशी स्वीकाराव्यात
- मराठी शाळांमधील अध्यापनाचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रशिक्षण द्यावे.
- मराठी शाळा समृद्ध होण्यासाठी सरकारने पावले उचलावीत
- मराठी साहित्य अधिकाधिक प्रमाणात ब्रेलमध्ये आमि बोलक्याष स्वरूपात हवे
- मराठवाड्याला पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे
- ज्ञानेश्वारांचे नाव युगप्रवर्तक म्हणून जाहीर करण्यासाठी युनेस्कोकडे आग्रह