www.24taas.com, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यातील सुरू असणारी शाब्दिक चकमक आणि त्यामुळे महाराष्ट्रभर त्याचे उमटणारे पडसाद यांच्या महाराष्ट्रातील राजकारणावर काय परिणाम होणार ह्याकडेच साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. तर आता ह्या राड्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर होणाऱ्या टीकेवर त्यांनी राज ठाकरेंना सुनावलं आहे. `आमच्या वरिष्ठ नेत्यांबाबात बोलतात, ते का बोलले.. तर दुसरीकडे महाराष्ट्रात दुष्काळ सुरू आहे, महिलांचा प्रश्न आहे, तेव्हा तुम्ही अशी घाणेरडी भाषा का करता.. आणि जेव्हा हत्ती चालत असतो तेव्हा दुसऱ्यांचं काय होतं हे सगळ्यांनाच माहिती आहे.` असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही त्यांची भूमिका मांडली आहे. `राजसाहेब त्यांचे काम करत आहे, आणि जेव्हा हत्ती चालत असतो तेव्हा आजूबाजूला लक्ष द्यायचं नाही... आणि `राज साहेबांच्या गाडीवर जर का दगड पडला असेल.. तर मी आवाहन करून मनसैनिक काही शांत बसणार नाहीत.` असा त्यांनी टोला लगावला आहे.
राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये सुरु असलेल्या राड्यानंतर सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं. तर राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी मात्र मी आवाहन करुन कार्यकर्ते थांबणार नसल्याचं सांगितलं. तसंच दोघींनीही हत्तीचा उल्लेख केल्यानं नेमका हत्ती कोण ? असा प्रश्न विचारला जातो आहे.