www.24taas.com, मुंबई
राज्यात आगामी काळात होणार्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला टार्गेट करायचे असेल तर मनसेशी संघर्ष करून त्यांना महत्व देण्याची रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसने आखली आहे. यामुळे मनसेला बंदुक दिल्याचे भासवून सेनेला संपविण्याची खेळी राष्ट्रवादीकडून रचण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे करीत असलेल्या टीकेकडे दुर्लक्ष करायचे की त्याला जशास तसे उत्तर द्यायचे याबाबत सोमवारी रात्री उपमुख्यमंत्र्यांच्या ‘देवगिरी’ या निवासस्थानी झालेल्या बैठकीत ही रणनिती आखण्यात आली. त्यात मनसेच्या विरोधात आता गप्प बसायचे नाही तर आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस गृहमंत्री आर.आर पाटील, प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्याच्या दुसर्याच दिवशी मंगळवारपासून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मनसेविरोधात राज्यात ठिकठिकाणी निदर्शने सुरू केली आहेत.
एका दगडात दोन पक्षी
- मनसेच्या विरोधात आक्रमक झाल्यास ज्या ठिकाणी शिवसेना मजबूत आहे, त्या भागात विशेषत: ग्रामीण महाराष्ट्रात मनसेला बळ मिळेल. दोघांच्या भांडणात मताचे विभाजन होईल आणि शिवसेना कमकुवत होईल. त्याचा फायदा राष्ट्रवादीला होणार असल्याने मनसेच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करायचे नाही, असा निर्णय या बैठकीत झाला.
आबा देणार राज ठाकरेंना प्रत्युत्तर
- राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांवर विरोधकांकडून टीका होत आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास पक्षाचेच नुकसान होईल. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तरे देऊन वेळीच हे हल्ले परतवून लावावेत.