www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी
पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक जीवाचं ब्राझील करायला निघाले आहेत. राज्य दुष्काळानं होरपळतंय. पण पिंपरीतल्या असंवेदनशील नेत्यांना ब्राझीलचा दौरा महत्वाचा वाटतोय.
माहितीची देवाण घेवाण व्हावी यासाठी ब्राझीलमध्ये विविध देशांच्या महापालिकेच्या पदाधिका-यांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधल्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना माहितीच्या देवाणघेवाणीची एवढी गरज भासतेय की या मेळाव्यासाठी ते थेट ब्राझीलला निघालेत. या दौ-याला सध्या तरी महापौर मोहिनी लांडे, उपमहापौर राजू मिसाळ, पक्ष नेत्या मंगला कदम आणि एक अभियंता जाणारय. पण अनेक इच्छुक नगरसेविकांनाही या दौ-यावर नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दुष्काळी परिस्थितीत संयमानं आणि सद्सद्विवेक बुद्धीनं वागण्याचा सल्ला दिलाय. पण पिंपरीतले पदाधिकारी मात्र ते विसरतायत. स्वतःच्या पैशानं हा दौरा करत असल्याचा युक्तिवाद ते करतायत.
दुसरीकडे विरोधक मात्र या दौ-यावर टीका करतायत. वास्तविक पाहता अनेक महापालिकेच्या पदाधिका-यांचे परदेश दौरे होतात. पण त्या दौ-यातून नेमकं शिक्षण काय मिळतं हे मात्र गुलदस्त्यात असतं.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.