www.24taas.com
कोल्हापुरात जयप्रभा स्टुडियोच्या खरेदीचा व्यवहार रद्द झालाय. स्टुडीओ खरेदी करणारे पोपट गुंदेचा यांनीच पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केलीय. 11 कोटींना हा स्टुडिओ विकला जाणार होता. जयप्रभा स्टुडिओ वाचण्यासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या सदस्यांनी प्रयत्न केले. चित्रपटसृष्टीचा हा मानबिंदू अखेर सुरक्षित राहिलाय.
मराठी चित्रपटसृष्टीचा मानबिंदू..कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ... मात्र गेल्या काही दिवसांपासून जयप्रभा स्टुडिओच्या विक्री प्रकरणावरुन कोल्हापुरात रणकंदन माजलं होतं. अखेर कोल्हापूरकरांच्या भावना लक्षात घेत हा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय गुंदेशा यांनी घेतला.
‘प्रभात फिल्म कंपनी’नं पुण्याला स्थलांतर केल्यानंतर राजाराम महाराजांनी 1934 मध्ये जयप्रभा स्टुडिओची उभारणी केली. केवळ चित्रपटविषयक कामकाज करण्याच्या अटीवर त्यांनी हा स्टुडिओ भालजी पेंढारकरांना दिला. त्यांच्याकडून गायिका लता मंगेशकरांनी हा स्टुडिओ विकत घेतला. मात्र चित्रपटविषयक कामाच्या हेतूची अट लक्षात न घेता लतादीदींनी हा स्टुडिओ गुंदेशा बिल्डरला विकण्याचा घाट घातला.
याची बातमी समजताच कोल्हापूरकरांनी रस्त्यावर उतरुन विक्रीविरोधात आवाज उठविला. तर अखिल भारतीय चित्रपट महामंडळानंही स्टुडिओ विक्रीविरोधात कोर्टात याचिका दाखल केली. कोर्टानं स्टुडिओ विक्रीप्रकरणी लतादीदींना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. या सातत्यानं दिलेल्या लढ्याला अखेर यश आलंय आणि जयप्रभा स्टुडिओचा व्यवहार अखेर रद्द झालाय.