www.24taas.com, झी मीडिया, सांगली
सांगली महापालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून काम करणारे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांची राष्ट्रवादीच्या उमेदवारी यादीने गोची केली आहे. आजवर ज्यांना गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात स्टेजवरून खाली उतरविण्यात आले, अशा गुन्हे नोंद असलेल्या लोकांनाच उमेदवारी दिल्याने आता त्यांचाही प्रचार गृहमंत्र्यांना करावा लागणार आहे. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या यादीत दंगल, खून, मारामारी, दहशत, चंदन तस्करी, गुंडगिरी, क्रिकेट बेटिंग असे, गुन्हे नोंद असलेले उमेदवार आहेत. तर तुम्हाला गुंडगिरी करता येत नाही, असे सांगत राष्ट्रवादीने मला उमेदवारी दिली नाही, असा गंभीर आरोप एका उमेदवाराने केला आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक येत्या सात जुलैला होत असून,यासाठी राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र यात गंभीर गुन्हे असलेल्याची नावे आहेत.यामध्ये माजी महापौर मैनुद्दीन बागवान, बाळू भोकरे, अल्लाऊद्दीन काझी, जमील बागवान,जमीर रंगरेज यांचा समावेश आहे. हद्दपारीच्या प्रस्तावित यादीत महेंद्र ऊर्फ बाळू भोकरे याचा समावेश आहे. तरीही त्यास राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने गृहमंत्र्यांसमोर प्रचाराचा यक्ष प्रश्न पडला आहे.
अर्थात ते राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत,म्हणून त्यांना ही संधी मिळाली म्हणे. मैनुद्दीन बागवान यांच्यावर दंगलीचा, त्यांचे बंधू जमील बागवान यांच्यावर क्रिकेट बेटिंगचा, बाळू भोकरेवर बेकायदा हत्यार बाळगल्याचा, अल्लाऊद्दीन काझी यांच्या वर मोरांच्या तस्करीचा, तर रंगरेज यांच्यावर दहशत माजविल्याचा गुन्हा दाखल झाला होता. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये या सर्वांवर गुन्हे दाखल झाले होते. पोलीस दफ्तरी ज्यांच्या नावांची नोंद झाली आहे, अशा लोकांचा समावेश यादीत आहे.
राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणून आर. आर. पाटील यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन ते करणार असल्यामुळे, साहजिकच प्रचार सभांत त्यांना या गुन्हेगारांचाही प्रचार करण्याची वेळ येणार आहे. सांगली आणि मिरजेत यापूर्वी जेव्हा राष्ट्रवादीचे कार्यक्रम झाले, त्यावेळी बागवान यांना स्टेजपासून बाजूला ठेवले होते. या निवडणुकीत हेच लोक आर.आर. यांच्या सोबत बसलेले दिसण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे गुन्हेगारी पार्श्वाभूमी असलेल्या उमेदवारांच्या प्रभागात अधिक दक्षता घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. असे प्रभाग संवेदनशील म्हणून जाहीर केले जाणार आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख दिलीप सावंत यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वआभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना हद्दपार करण्याचा निर्णय घेतला. हद्दपारीच्या प्रस्तावित यादीत महेंद्र ऊर्फ बाळू भोकरे याचा समावेश आहे. तरीही त्यास राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने गृहमंत्र्यांसमोर प्रचाराचा यक्षप्रश्न पडला आहे.राष्ट्रवादी उमेदवारांच्या एकत्रित प्रचारासाठी त्यांना निमंत्रित केले जाणार आहे. अशावेळी त्यांना सर्वच उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना करावे लागणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.