गारपिटीनं लालेलाल डाळिंब कुजले... सडले

अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातल्या डाळिंबांना मोठा फटका बसलाय. गारपिटीच्या तडाख्यानं डाळीबांना तडे गेल्यानं ते फेकून देण्याची वेळ शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 15, 2014, 04:12 PM IST

www.2taas.com, झी मीडिया, नाशिक
अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातल्या डाळिंबांना मोठा फटका बसलाय. गारपिटीच्या तडाख्यानं डाळीबांना तडे गेल्यानं ते फेकून देण्याची वेळ शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर आलीय. ज्या बाजार समितीमध्ये डाळिंबाचे व्यापार केले जातात त्याच ठिकाणी सध्या डाळिंबाचे ढिग आलेत.
नाशिकच्या बाजार समितीत विक्रीसाठी आणलेले डाळिंब खरेदीच्या प्रतिची नसल्यानं अक्षरश: फेकून देण्यात आलीत. सटाणा, मालेगाव देवळा, दिंडोरी, नांदगाव, कळवण चांदवड तालुक्यातल्या २४ हजार ८५२ एकरावरच्या  शेकडो कोटी रुपयांच्या डाळिंबाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जी डाळिंब थोडीफार वाचलीत ती विक्रीसाठी बाजार समितीमध्ये आणण्यात आली. मात्र, या मालाला उठाव मिळत नसल्यानं वाहतूक खर्च करून आणलेला माल फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीय. गारपिटीच्या नावाखाली चांगल्या डाळींबाला व्यापारी कमी भाव देत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
शेतकऱ्यांसारखीच व्यापाऱ्यांचीही अवस्था आहे. नशिक जिल्ह्यातून उतर प्रदेश मध्य प्रदेश बिहार, राजस्थानच्या बाजारपेठेत डाळिंबाची विक्री होते. बाजारपेठेत शेतीमाल जाण्यासाठी कमीतकमी १२ तासाचा कालावधी लागत असल्यानं आधीच खराब झालेला माल तिथे गेल्यावरही फेकून देण्याची वेळ येत असल्याचं व्यापारी सांगतायत.
केंद्रीय समितीच पथक नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. गेल्या तीन दिवसांपासून शेतकऱ्यांना पथक येणार असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र, हे पथक शेवटपर्यंत आलंच नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करतायत. नियतीनं दिलेल्या या जखमांमधून सावरण्यास शेतकऱ्यांना किमान तीन वर्ष तरी जातील असा अंदाज व्यक्त केला जातोय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.