प्रसिद्ध पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) सध्या मुंबईत आहे. मुंबईत त्याचं कॉन्सर्ट पार पडलं आहे. दरम्यान या निमित्ताने राज्य सरकारने एक नियमावली जाहीर केली होती. दिलजीत दोसांझने कॉन्सर्टदरम्यान या नियमावलीवर भाष्य केलं आहे. नियमावलीत दिलजीत दोसांझला ड्रग्स, हिंसा आणि मद्य यांना प्रोत्साहन देणारी गाणी न गाण्यास सांगण्यात आलं होतं. तसंच स्टेजवर लहान मुलांचा वापर करण्यापासूनही त्याला प्रतिबंधित करण्यात आलं.
कॉन्सर्टदरम्यान प्रेक्षकांना संबोधित करताना दिलजीत दोसांझने सांगितलं की, "मी काल माझ्या टीमला माझ्याविरोधात काही नियमावली तर जाहीर केलेली नाही ना, अशी विचारणा केली. त्यांनी सर्व काही ठीक असल्याचं सांगितलं. आज सकाळी उठलो तर माझ्याविरोधात नियमावली जारी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. पण तुम्ही काळजी करु नका. ही नियमावली माझ्यासाठी आहे. तुम्ही जी मजा करण्यासाठी आला आहात त्याच्या दुप्पट मजा करायला देतो".
दरम्यान यावेळी दिलजितने आपल्या काश्मीर दौऱ्यावरही भाष्य केलं. काश्मीरला एकदा तरी गेलं पाहिजे, तो खऱ्या अर्थाने स्वर्ग आहे असं तो म्हणाला. आपल्या भारत दौऱ्यात दिलजीत दोसांझने चंदीगड, पुणे, कोलकाता, हैदराबाद, लखनऊ, अहमदाबाद, दिल्ली, इंदोर आणि जयपूरमध्ये परफॉर्म केलं आहे. गुवाहाटीमधील दौऱ्यानंतर त्याचा हा दौरा संपणार आहे.
दिलजीत दोसांझने जोपर्यंत कॉन्सर्टसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा योग्य प्रकारे विकसित केल्या जात नाहीत तोपर्यंत आपण भारतात एकही कॉन्सर्ट करणार नसल्याचं म्हटलं आहे. 14 डिसेंबरला चंदिगडमधील आपल्या लाईव्ह शोमध्ये दिलजीत दोसांझने ही घोषणा केली आहे.
शनिवारी दिलजीतने चंदीगडमध्ये परफॉर्म केलं. यावेळी त्याने त्याचा दिल-लुमिनाटी कॉन्सर्ट आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचा (FIDE) जागतिक चॅम्पियन झालेल्या गुकेश डोम्माराजूला समर्पित केला. गुकेशने लहानपणापासूनच त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी केलेल्या मेहनतीची आणि समर्पणाची त्याने प्रशंसा केली.