Jobs In India EV Market: भारतात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या कारणामुळे विरोधक केंद्र सरकारवर निशाणा साधत असतात. पण येणाऱ्या काळात रोजगाराच्या मोठ्या संधी चालून येण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी देशातील इलेक्ट्रिक वाहन बाजाराबाबत मोठी घोषणा केली. नोकरीच्या शोधात असलेल्या आणि करिअरच्या नव्या वाटा शोधणाऱ्या तरुणांसाठी ही अत्यंत महत्वाची अपडेट आहे.
ईव्ही फायनान्स मार्केट 2030 पर्यंत 4 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 2030 पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ 20 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या क्षेत्रात तब्बल 5 कोटी रोजगार निर्माण होतील, असे नितीन गडकरींनी म्हटलंय.निम्म्या वायू प्रदूषणासाठी वाहतूक क्षेत्र जबाबदार असल्याचे ते यावेळी म्हणाले. आठव्या EVExpo (Evexpo 2024) मध्ये गडकरी बोलत होते.
फॉसिल फ्यूयलमुळे देशात अनेक समस्या निर्माण होत आहेत. आपण 22 लाख कोटी रुपयांचे जीवाश्म इंधन आयात करतोय, हे एक मोठे आर्थिक आव्हान आहे. जीवाश्म इंधनाची ही आयात आपल्या देशात अनेक समस्या निर्माण करत आहे. दुसरीकडे सरकार हरित ऊर्जेवर भर देत आहे. कारण देशातील 44 टक्के उर्जा ही सौर ऊर्जा आहे. जलविद्युतपासून हरित ऊर्जेचा विकास, त्यानंतर सौरऊर्जा आणि बायोमासपासून हरित उर्जेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे नितीन गडकरींनी यावेळी सांगितले.
यावेळी गडकरींनी इलेक्ट्रिक बसेसच्या तुटवड्याचा उल्लेख केला.देशाला एक लाख इलेक्ट्रिक बसेसची गरज आहे. पण पायाभूत सुविधा पाहता सध्याची क्षमता 50 हजार बसेसची असल्याचे ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर ऑटो कंपन्यांनी गुणवत्तेशी तडजोड न करता कारखाने वाढवावेत, असे आवाहन करत हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी सांगितले. 2014 मध्ये गडकरींनी परिवहन मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. त्यावेळी देशाच्या ऑटोमोबाईल क्षेत्र 7 लाख कोटी रुपयांचे होते, आज ते 22 लाख कोटी रुपयांचे आहे.
ऑटोमोबाईल क्षेत्रात आपण जगात तिसऱ्या क्रमांकावर आहोत. आपण जपानला मागे टाकले आहे. अमेरिका (78 लाख कोटी) आणि चीन (47 लाख कोटी) नंतर भारताचे ऑटोमोबाईल क्षेत्र जगात तिसरे आहे. आगामी काळात आपल्याला चीनला मागे टाकायचं आहे. येत्या पाच वर्षात देशाला अव्वल स्थानावर पोहोचण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले. ऑटोमोबाईल उद्योगाचे भविष्य चांगले आहे. या क्षेत्रात आपल्याला चीनशी स्पर्धा करायची आहे. यासाठी चांगले तंत्रज्ञान आणि गुणवत्तेची गरज असल्याचे गडकरी म्हणाले. सध्याच्या घडीला लिथियम आयन बॅटरीचे उत्पादन वाढणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. टाटा, अदानी आणि मारुती या सारख्या कंपन्या बॅटरी बनवण्याच्या प्रक्रियेत आहेत. देशात 16 हजार ईव्ही चार्जिंग स्टेशन आहेत आणि 2 हजार 800 पाइपलाइनमध्ये असल्याची माहिती त्यांनी दिली.