भोपाळमध्ये आयकर विभाग आणि लोकायुक्त पोलिसांनी वेगवेगळ्या छाप्यांमध्ये कोट्यवधींचे सोने आणि रोख रक्कम जप्त केली आहे, ज्यामुळे राजकारणी, सरकारी अधिकारी आणि रिअल इस्टेट कंपन्यांमधील कथित संबंध उजेडात आले आहेत. विशेष म्हणजे तब्बल 40 कोटींच्या किंमतीच 52 किलो सोनं आणि 10 कोटींची रोख रक्कम एका बेवारस स्थितीत सोडण्यात आलेल्या इनोव्हा कारमध्ये सापडले आहेत.
जंगलाच्या मार्गाने सोन्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहराच्या बाहेरील मेंडोरी जंगलात ही कार आढळली. 100 पोलिसांच्या पथकाने आणि 30 पोलिसांच्या वाहनांनी कारला घेरले जेणेकरून ती पळून जाऊ नये. पण जेव्हा कार सापडली तेव्हा आत कोणीही आढळले नाही. आतमध्ये फक्त सोनं आणि रोख रकमेच्या गठ्ठ्यांसह दोन बॅगा होत्या.
ही कार ग्वाल्हेर येथील रहिवासी आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) माजी कॉन्स्टेबल सौरभ शर्मा यांचे सहकारी चेतन गौर यांची असल्याचं सांगण्यात येत आहे. शर्मा आणि अनेक बांधकाम व्यावसायिकांवर आधीच चौकशी सुरू आहे. जप्त केलेले सोनं आणि रोख रक्कम त्यांच्याशी संबंधित असू शकतं असा संशय आहे. तथापि, जप्ती केल्यानंतर अद्यापपर्यंत कोणताही दावा करण्यात आलेला नाही आणि मालमत्तेचा स्रोत शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
दरम्यान, भोपाळमधील पॉश अरेरा कॉलनीमध्ये गुरुवारी लोकायुक्त पथकाने शर्मा यांच्या घरावर छापा टाकला. छाप्यादरम्यान अधिकाऱ्यांना एक कोटींहून अधिक रोख रक्कम, अर्धा किलो सोने आणि हिरे, चांदीच्या विटा आणि मालमत्तेची कागदपत्रं सापडली.
गेल्या दोन दिवसांपासून भोपाळमध्ये सुरू असलेल्या मॅरेथॉन शोध मोहिमेचा भाग म्हणून हे छापे टाकण्यात आले होते, ज्यामध्ये प्रमुख बांधकाम व्यावसायिकांना लक्ष्य करण्यात आलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशी सुरू असलेल्या बांधकाम व्यावसायिकांचे प्रमुख राजकारणी आणि नोकरशहांसोबत संबंध आहेत.
छापे टाकण्यात आलेल्यांमध्ये स्थानिक बांधकाम व्यवसायातील एक प्रमुख व्यक्ती असलेल्या त्रिशूल कन्स्ट्रक्शन्सचे राजेश शर्मा यांचाही समावेश आहे. त्याचे एका अतिशय वरिष्ठ माजी नोकरशहा आणि प्रभावशाली व्यक्तींशी जवळचे संबंध असल्याची माहिती आहे.
बिल्डर्सवरील छाप्यांमध्ये 3 कोटी रुपये रोख, लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने आणि जमीन आणि मालमत्ता खरेदीशी संबंधित कागदपत्रं जप्त करण्यात आली. पोलिसांना शर्मा यांचे सुमारे 10 लॉकर आणि 5 एकर जमीन खरेदीची माहिती देणारी कागदपत्रे देखील सापडली.