साहित्य महर्षींच्या भूमीत नाट्यक्षेत्र पोरकं!

नाशिक शहरातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात नाट्यरसिक आणि कलाकारांची संख्या मोठी आहे. मात्र, त्या तुलनेत ना रसिकांना सुविधा मिळतात ना कलाकारांना...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 22, 2013, 01:30 PM IST

www.24taas.com, नाशिक
मराठी रंगभूमीवर वेगवेगळ्या विक्रमांची नोंद होत असतानाच नाशिकच्या नाट्य चळवळीला मात्र घरघर लागल्याचं चित्र आहे. नाशिक शहरातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात नाट्यरसिक आणि कलाकारांची संख्या मोठी आहे. मात्र, त्या तुलनेत ना रसिकांना सुविधा मिळतात ना कलाकारांना... ज्या कुसुमाग्रज, कानेटकरांचं नाव घेऊन मराठीचं राजकारण केलं जातं त्या साहित्य महर्षींच्या भूमीतच नाट्यक्षेत्राला कुणीही वाली दिसत नाही.
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आणि कानेटकर या दोन महान विभूतींच्या भूमीत नाट्य चळवळीला घरघर लागलीय. नाशिकमध्ये महापालिकेचं कालिदास कलामंदिर, पंचवटीत पंडित पलुस्कर सभागृह, भाभानगरमध्ये दादासाहेब गायकवाड सभागृह ही नाट्यगृहं आहेत. त्याशिवाय नाशिकरोड आणि सातपूरमध्ये महापालिकेनं टाऊन हॉल बांधलेत. मात्र, त्यांचा फारसा उपयोगच होत नाही. तुटक्या खुर्च्या, सदोष प्रकाश योजना, साऊंड सिस्टीमचीही दूरवस्था, अव्यवस्थित मेकअपरुम, अशी अवस्था बहुतांश नाट्यगृहांमध्ये आहे. एका नव्या नाट्यगृहाचा प्रस्ताव वर्षभर रखडलाय. येवल्यामध्ये २००९ मध्ये सुरू झालेल्या नाट्यगृहाचं बांधकाम अजूनही पूर्ण झालेलं नाही.
मनमाडमध्ये गेल्या नऊ वर्षांपासून नाट्यगृहाचा उपयोग हा फक्त लग्नसमारंभासाठी केला जातो. अहमदनगर, धुळे जिल्ह्यातही हीच परिस्थिती आहे. जळगावातील नाट्यरसिकांच्या सोयीसाठी ३५ कोटी रूपयांचं नाट्यगृह मंजूर झालंय. पण राजकीय इच्छाशक्तीमुळे ते कधी सुरु होणार याची वाट नाट्यरसिक बघत आहेत.

नाशिकमध्ये प्रायोगिक बरोबरच व्यवसायिक नाटकांनाही चांगली मागणी आहे. मात्र, केवळ महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सुविधा मिळत नाहीत. जर नाट्यगृहं सुस्थितीत असतील तरच स्थानिक कलाकारांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. मात्र, त्यासाठी गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची...