www.24taas.com, अमित देशपांडे, वर्धा
आज गांधी जयंती... देशभरात गांधी जयंतीच्या निमित्तानं महात्मा गांधींना वंदन करण्यात येतंय. मात्र, वर्ध्यातला महात्मा गांधींचा सेवाग्राम आश्रम वेगळ्या कारणांमुळं चर्चेत आलाय. आश्रमात गांधीजींच्या वस्तू चोरीच्या घटना वाढल्यात. मात्र, सुरक्षेचे उपाय करण्याबाबत आश्रमप्रशासन तयार नसल्याचा खुलासा झालाय.
महात्मा गांधींजींच्या अनेक सत्याग्रह आणि आंदोलनाचा साक्षीदार असलेला वर्ध्याचा सेवाग्राम आश्रमात गांधीजींचं १२ वर्ष वास्तव्य होतं. मात्र, हा आश्रम वेगळ्या कारणामुळं चर्चेत आलाय. आश्रमातले महामंत्री विनोद स्वरुप यांनी आश्रमातले वाद समोर आणलेत. गांधीजींच्या अनेक वस्तू आठवणी रुपात या आश्रमात आहेत. मात्र, गेल्या वर्षी गांधीजींच्या चष्मा चोरीची धक्कादायक घटना आश्रमात घडली. अद्यापही तो चष्मा शोधण्यात यश आलेलं नाही. चष्माच नाही तर गांधीजींच्या अनेक वस्तू आश्रमातून चोरीला गेल्याबाबतचा खुलासा खुद्द गांधीजींची नात सुमित्रा कुलकर्णी यांनी एका पत्रात केला होता. त्यामुळं आश्रम सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. याबाबतचं वास्तव आश्रमाचे महामंत्री विनोद स्वरुप यांनी समोर आणलंय.
गांधीजींचा चष्मा आणि इतर वस्तूंच्या चोरीच्या घटनेनंतर आश्रमात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची मागणी गांधीवादी नेत्यांनी केलीय. शिवाय, सुरक्षागार्ड तैनात करण्याची मागणीही जोर धरतेय. मात्र, आश्रम प्रशासनाच्या हेकेखोर धोरणामुळं त्याकडं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय.
गांधीजींचा महाराष्ट्रातला एकमेव असा सेवाग्राम आश्रम आहे. त्यामुळं त्यांच्या आठवणी आणि वस्तूंचं जतन तसंच सुरक्षाही तितकंच महत्त्वाचं आहे. मात्र, आश्रम प्रशासनाच्या अंतर्गत वादामुळं त्याकडं अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय.