मुंबई : मुलगी 'कुरुप' असेल तर तिचा विवाह होण्यासाठी तिच्या पालकांना जास्त हुंडा द्यावा लागतो, असं धक्कादायक विधान महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात छापण्यात आलंय.
मुलीची 'कुरुपता' हे हुंड्यामागचं एक प्रमुख कारण असल्याचं या पुस्तकात म्हटलं गेलंय. पण, 'कुरुपते'ची व्याख्या ही प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकतो तसंच पाठ्यपुस्तकात 'मतं' मांडत आणि सरसकट विधान करणं हे हुंड्याचं एकप्रकारे उदात्तीकरण असल्याचं म्हटलं जातंय. सोशल मीडियात या मुद्द्यावर अनेकांनी आपला रोष व्यक्त केलाय.
'कुरुपता' अशा हेडिंगखाली मुलगी जर कुरुप आणि अपंग असेल तर तिचं लग्न होणं खूप कठिण होऊन बसतं. अशा मुलींशी लग्न करण्यासाठी नवरा मुलगा आणि त्याच्या कुटुंबियांकडून अधिक हुंड्याची मागणी केली जाते. अशावेळी मुलगी पालक हतबल होतात आणि मागितलेला हुंडा देतात, असं कारण या पुस्तकात नमूद करण्यात आलंय.
याबद्दल, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाला स्पष्टीकरण विचारलं असता सावध भूमिका घेत लवकरच या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचं म्हटलंय.