मुंबई पालिकेवर भगवा, पण महापौरांसमोर अडथळ्यांच्या शर्यत

महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा कायम राखण्यात अखेर शिवसेनेला यश आलं. भविष्यातल्या अडथळ्यांच्या शर्यतीचीही चुणूक पाहायला मिळाली. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 8, 2017, 11:44 PM IST
मुंबई पालिकेवर भगवा, पण महापौरांसमोर अडथळ्यांच्या शर्यत title=

मुंबई : महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा कायम राखण्यात अखेर शिवसेनेला यश आलं. महापौरपदावर शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर भरघोस मतांनी निवडून आले. तर उपमहापौरपदावर शिवसेनेच्या हेमांगी वरळीकर यांची निवड झाली. अर्थात शिवसेनेला हे यश मिळालं असलं तरी भविष्यातल्या अडथळ्यांच्या शर्यतीचीही चुणूक पाहायला मिळाली. 

मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा शिवसेनेचाच महापौर विराजमान झाला तर प्रदीर्घ काळानंतर शिवसेनेलाच उपमहापौरपदही मिळालं त्यासाठी सुरू असलेला हा जल्लोष. शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर भरघोस मतांनी निवडून आले. तर उपमहापौरपदी हेमांगी वरळीकर विजयी झाल्या. विठ्ठल लोकरे हे काँग्रेसकडून महापौरपदाच्या रिंगणात उतरले होते.

महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत एकूण 218 नगरसेवकांनी मतदान केलं. राष्ट्रवादीचे 9, समाजवादी पार्टीचे 6 तर एक अपक्ष अशा 16 नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली. तर मनसेच्या 7 आणि एमआयएमच्या 2  अशा 9 नगरसेवकांनी मतदानाला दांडी मारली. 
शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांना शिवसेनेच्या 84  आणि भाजपच्या 82 नगरसेवकांसह पाच अपक्षांनी पाठिंबा दिला. त्यामुळं महाडेश्वरांना भरघोस 171 मते मिळाली. तर काँग्रेसच्या विठ्ठल लोकरे यांना केवळ 31 मते मिळाली. 

एकीकडे शिवसेनेचं विजयाचं जल्लोषी वातावरण असलं तरी या निवडणुकीत शिवसेनेसमोर वाढून ठेवलेल्या अडथळ्यांच्या शर्यतीची चुणूकही यावेळी दिसून आली. महापौरांची निवड झाल्यावर शिवसेना आणि भाजप यांच्यात जोरदार घोषणायुद्ध रंगलं. भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिला असला तरी भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहात मोदींच्या नावाने घोषणाबाजी केली. 

भाजपच्या या घोषणाबाजीला प्रत्युत्तर म्हणून शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या नावानं घोषणा देत सभागृह दणाणून सोडलं. भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी कमळाच्या फुलांची माळ घालून विश्वनाथ महाडेश्वर यांचं अभिनंदन केलं. येत्या पाच वर्षात प्रस्तावांमधील काही बाजू योग्य नसतील तर त्याला विरोध करणारच असं सांगत कोटक यांनी भविष्यातील संघर्षाचं भाकित केलं.   

भाजपच्या या टीकेला शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर मिळालं. पारदर्शकतेचा मुद्दा आता काही दिवसांनी मागे पडेल. भाजपलाच आता पारदर्शकतेची आवश्यकता असल्याचा टोला शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी लगावला. 

मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपची घोषणाबाजी तर शिवसेनेचा  जल्लोष दिसून आला. मात्र सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे बीएमसीत माफियाकराजचा आरोप करणा-या भाजपनं शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला. ही भाजपची अपरिहार्यता आहे की मास्टरस्ट्रोक याचीच चर्चा सुरु झाली आहे.