मुंबई: महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वादात उडी टाकणाऱ्या शरद पवारांनी आता या वादावर पडदा पडावा अशी भूमिका मांडली आहे. बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासकार नाहीत, अशी टीका शरद पवारांनी मागील आठवड्यात केली होती. तसंच बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास पवारांनी विरोध दर्शवला होता.
आता तेच पवार या वादावर पडदा पडावा असं म्हणत आहेत. राज ठाकरेंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेलाही पवारांनी उत्तर दिलं आहे. आजही प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझ्या नावाचा वापर करावा लागतो, असा टोला पवारांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
विश्वास पाटलांचा बाबासाहेबांना पाठिंबा, नेमांडेंना सुनावलं
साहित्यिक विश्वास पाटीलदेखील महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वादात उतरले आहेत. भालचंद्र नेमाडे हे साहित्यातले दहशतवादी असून शिवराय आणि संभाजींवर बोलण्याचं खुलं आव्हान त्यांनी नेमाडेंना दिलंय. तसंच बाबासाहेब पुरंदरे ब्राम्हण असल्यामुळंच त्यांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोपही विश्वास पाटलांनी केलाय.
जातीपातीवरून लोकांची माथी भडकावण्याचं काम पवार करतायेत
दरम्यान, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनीही शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केलीय. जातीपातीवरून लोकांची माथी भडकावण्याचं काम पवार आणि मंडळी करतायत, असं शेलार म्हणाले.
मुख्यमंत्र्यांविरोधात कट- राज ठाकरे
महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून सुरू असलेला वाद हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कट रचला जात आहे असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झी 24 तासला दिलेल्या एक्स्ल्युझिव्ह मुलाखतीत केलाय. भाजपचे काही मंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये साटंलोटं असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केलाय. राज ठाकरे यांचा रोख विनोद तावडे यांच्यावरच आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.