www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कॅम्पा कोला कम्पाऊंडमधील फ्लॅट धारकांना घरं रिकामी करण्यासाठी सुप्रीम कोर्ट आणि महापालिकेनं दिलेली मुदत सोमवारी रात्री संपली. मात्र रहिवाशांनी मागील आठवड्यात पुन्हा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ज्यावर सुनावणी करताना कोर्टानं आज ही याचिका फेटाळून लावली.
कॅम्पा कोला रहिवाशांना सुप्रीम कोर्टानं ३१ मेपर्यंत घरे रिकामी करण्याचे आदेश दिले होते. तर पालिकेनं २९ मे ते २ जून या कालावधीत जी-दक्षिण प्रभाग कार्यालयात घरांच्या चाव्या जमा करण्याच्या नोटीसा पाठवल्या होता. सोमवारी संध्याकाळपर्यंत एकाही रहिवाशानं पालिकेच्या आवाहनाला दाद न देता घरं रिकामी करणार नाही, असा निर्धार केला आहे. सुप्रीम कोर्ट मंगळवारी काय निर्णय देते, याकडं राज्य सरकार आणि महापालिकेचं लक्ष लागून राहिलं होतं.
आज कोर्टानं कॅम्पा कोलाच्या रहिवाशांची माहिती फेटाळून लावली, त्यामुळं कारवाई होणारच असं चित्र स्पष्ट झालंय. मागील वर्षी पावसाळा तोंडावर असताना कॅम्पा कोलाची याचिका सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी आली होती. तेव्हा कोर्टानं मानवतावादी दृष्टीकोनातून पावसाळ्यासह पाच महिन्यांची मुदतवाढ दिली होती.
यंदाही तशीच परिस्थिती उद्भवली आहे. अशी मुदतवाढ मिळाल्यास पावसानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळं हे प्रकरण आणखी काही महिने पुढं ढकललं जाण्याची शक्यता होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.