मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फुटतायत. पण राजधानी मुंबईत मात्र सध्या चिडीचूप आहे. अद्याप कोणत्याही पक्षानं उमेदवार यादी जाहीर केलेली नसल्यानं उमेदवारांना प्रचार सुरु करता आलेला नाहीय.
विधानसभेची निवडणूक जाहीर होऊन आठवडा उलटला तरी अजून जागावाटपाचा घोळ मिटलेला नाही. त्यामुळं संभाव्य उमेदवारांना जाहीरपणं प्रचारही करता येत नाहीय. त्यातच पितृपक्ष असल्यानं अनेक उमेदवारांनी प्रचाराचा मुहूर्त देखील ठरवला नाहीय. आधीच निवडणुकीचे दिवस कमी असताना, जास्तीत जास्त मतदारांपर्यंत कसं पोहोचायचं, अशा पेचात उमेदवार पडलेत.
दरम्यान, संभाव्य उमेदवारांमध्ये राष्ट्रवादीकडून सचिन अहिर, भाजपकडून आशिष शेलार, शिवसेनेकडून श्वेता परुळेकर यांच्या नावाची चर्चा आहे.
तर दुस-या बाजूला उमेदवार जाहीर झाले नसले तरी आपल्याच नेत्याला तिकीट मिळणार याची कार्यकर्त्यांना पक्की खात्री वाटते. त्यामुळे ते गुडघ्याला बाशिंग बांधून प्रचाराच्या तयारीला लागलेत. तर प्रचाराची जबाबदारी असलेले पदाधिकारी मात्र, उमेदवारांच्या अधिकृत यादीची वाट पाहत आहेत.
प्रचाराला अवघे काही दिवस असतानाच मुंबईत प्रचार मात्र खोळंबलाय. त्यामुळे कमी दिवसांत अख्खा मतदारसंघ पिंजून काढण्याचं आव्हान आता उमेद्वारांपुढे असणार आहे.
निदान पुढच्या आठवड्यात तरी उमेदवारांची घोषणा होईल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर प्रचाराला ख-या अर्थानं सुरुवात होईल. पण परीक्षा पूर्व तयारीलाच उशीर झाल्यानं त्याचा परिणाम निकालावर होण्याची भीती उमेदवारांना आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.