www.24taas.com, मुंबई
केंद्रात वेगानं सुरू असलेल्या राजकीय घडामोडींकडे सा-या देशाचं लक्ष लागलंय. मात्र अशा वेळी महाराष्ट्राला नेहमीच वेध लागतात ते पवारांच्या भूमिकेचे. युपीए सरकारमधल्या घडामोडींवर अखेर पवारांनीही आपली भूंमिका स्पष्ट केलीय. अल्पमतातलं सरकारही आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केलाय. पी व्ही नरसिंहराव यांचे सरकार अल्पमतातले होते. मात्र त्या सरकारनंही आपला कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण केला होता. आणि आपण याचे साक्षीदार असल्याचं पवारांनी नमूद केलंय.
ममता बॅनर्जींना पाठिंबा काढला असला तरी युपीए सरकारला कसलाही धोका नसल्याला दावा काँग्रेसनं केलाय. बहुमत सरकारच्या बाजुनं असून कठीण परिस्थितीत सरकारला पाठिंबा देण्यासाठी मित्र पक्ष धावून येतील असा विश्वासही काँग्रेस नेत्या अंबिका सोनी यांनी व्यक्त केलाय. ममता बॅनर्जींना पाठिंबा काढल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या निवासस्थानी काँग्रेस कोअस कमिटीची बैठक झाली. याबैठकीत इंधन दरवाढ आणि एफडीआयच्या निर्णयांवर ठाम असल्याची माहिती अर्थमंत्री पी चिदम्बरम यांनी दिलीय. ममता बॅनर्जींशी चर्चा करण्याचा सरकार प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. घेतलेले निर्णय़ कसे गरजेचे आहेत याबाबतदेखील तृणमूलच्या नेत्यांना पटवून देण्याचा सरकार प्रयत्न करणार असल्याचीही माहिती त्यांनी दिलीय.
पंतप्रधानांनी तृणमूल काँग्रेससोबत गेल्या आठवड्यात दोन वेळा संपर्क साधला असल्याचंही चिदम्बरम यांनी सांगितलं. मात्र ममता दरवाढ आणि एफडीआयचे निर्णय मागे घेण्याबाबत ठाम असल्यानं सरकारची चांगलीच कसोटी लागणार आहे.