मुंबईत मोबाईलच्या प्रकाशात होतायत अंत्यसंस्कार

सू्र्य मावळल्या नंतरही जिथं कधी अंधार नसतो असं शहर म्हणजे मुंबई.. रस्त्यांपासून मैदानांपर्यंत लख्ख रोषणाईनं न्हाऊन निघालेल्या या शहराला मात्र घाटकोपरच्या स्मशानभूमीचा विसर पडलाय. कारण विजेच्या अभावी इथं चक्क मोबाईलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.

Updated: May 13, 2017, 10:39 PM IST
मुंबईत मोबाईलच्या प्रकाशात होतायत अंत्यसंस्कार title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया घाटकोपर : सू्र्य मावळल्या नंतरही जिथं कधी अंधार नसतो असं शहर म्हणजे मुंबई.. रस्त्यांपासून मैदानांपर्यंत लख्ख रोषणाईनं न्हाऊन निघालेल्या या शहराला मात्र घाटकोपरच्या स्मशानभूमीचा विसर पडलाय. कारण विजेच्या अभावी इथं चक्क मोबाईलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.

घाटकोपर पश्चिमेतली ही बर्वेनगर स्मशानभूमी... नुकतंच या स्मशानभूमीचं नामकरण पा. रा. कदम वैकुंठभूमी असं करण्यात आलंय. मात्र, या स्मशान भूमीत अनेक समस्यां आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत.

घाटकोपर पश्चिमेच्या चिरागनगर, पारशीवाडी, भटवाडी, असल्फा, रामजी नगर इथल्या लाखो रहिवाश्यांना ही स्मशानभूमी जवळ पडते. इथं रोज सरासरी दहा ते वीस मृतदेह अंत्यविधीसाठी येतात. मात्र स्मशानभूमीचा वीज पूरवठा खंडीत करण्यात आलाय. वीज पुरवठा नसल्यानं इथली विद्युत दाहिनी महिनाभरापासून बंद आहे. स्मशानभूमीवर आतापर्यंत पालिकेनं लाखो रुपये खर्च केले. मात्र कधी या ठिकाणी असेली धूर वाहून नेणारी चिमणी बंद पडते... तर कधी इथल्या नळाला पाणी नसते... आता तर वीजपुरवठाच खंडीत केल्यानं रात्री अंत्यविधीसाठी इथं येणाऱ्या नागरिकांना चाचपडत किंवा मोबाईलच्या प्रकाशात अंत्यविधी पार पाडावे लागतात. या स्मशानभूमीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार देखील इथल्या स्थानिकांनी केलीय.

रहिवाशांचा 'झी हेल्पलाईन'शी संपर्क...

वारंवार या स्मशानभूमतल्या समस्या इथल्या नागरिकांनी पालिका प्रशानाकडे केल्या. सातत्यानं याचा पाठपुरावा केला. मात्र, त्यावर काहीच कारवाई होत नव्हती. त्यामुळे इथल्या नागरिकांनी 'झी हेल्पलाईन'शी संपर्क साधला. या  तक्रारींची दखल घेत झी हेल्पलाईनची टीम घाटकोपरमध्ये पोहोचली... रहिवाशांशी चर्चा केली... स्मशानभूमीतले दिवे बंद होते... फक्त एकाच नळाला पाणी होतं... बालकांच्या स्मशान भूमीत लाईट नसल्याने काळोख होता... तर धूराचा त्रास कमी करण्यासाठी बसवलेली लाखो रुपयांची चिमणी बंद होती... इतकच काय तर मुख्य फलकावरचा पिनकोडदेखील चुकीचा होता. 

महापालिका निवडणुकीत प्रभाग बदल्यामुळे जुन्या नगरसेवकांनी लक्ष देणं बंद केलं होतं.. त्यामुळे या संदर्भात झी हेल्पलाईनच्या टीमनं स्थानिक नगरसेवक आणि एन-विभाग समितीचे अध्यक्ष तुकाराम पाटील यांची भेट घेतली.. स्मशानभूमची दुरवस्ता त्यांच्या कानावर घातली.. 15 दिवसात वीज  आणि पाण्याचा पुरवठा पूर्ववत करण्याच आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं.. इतर प्रश्नही तातडीनं मार्गी लावू असंही ते म्हणाले. 

येत्या 15 दिवसांत या स्मशानभूमीतील समस्या दूर होतील अशी आशा करायला हरकत नाही.. प्रभाग समिती अध्यक्षांनी तसं आश्वासन दिलं असलं तरी झी हेल्पलाईन केवळ या आश्वासनावर स्वस्थ बसणार नाही.. जोपर्यंत स्मशानभूमीतील समस्यांचा  पाढा संपणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील.